कंडोम बनवणारी कंपनी मॅनकाइंड फार्माच्या अडचणीत वाढ करणारी ही बातमी आहे. कारण कंपनीच्या दिल्ली इथल्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा (IT raid) टाकलाय. त्यानंतर शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स (Shares) 5.50 टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दुसरीकडे मॅनकाइंड कंपनी अथवा आयटी डिपार्टमेंटकडूनही कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
Table of contents [Show]
ट्रेडिंगदरम्यान गडगडला शेअर
या सर्व कारवाईनंतर मॅनकाइंड फार्माच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळतेय. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, सकाळी 11.20दरम्यान 2.42 टक्क्यांनी घसरला. त्यावेळी तो 1348.30 रुपयांवर व्यवहार करत होता. आज कंपनीचा शेअर 1371 रुपयांवर उघडला. ट्रेडिंगच्या सत्रादरम्यान 1306 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1381.80 रुपयांवर बंद झाला होता.
IT RAID AT MANKIND PHARMA OFFICE#BREAKING
— RedboxGlobal India (@REDBOXINDIA) May 11, 2023
दोन दिवसांपूर्वीच झाली होती धमाकेदार एन्ट्री
मॅनकाइंड फार्माच्या शेअर्सची मंगळवारी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री झाली होती. कंपनीची इश्यू किंमत जवळपास 1080 रुपये होती. 20 टक्के प्रीमियमसह 1300 रुपयांवर लिस्ट झाली होती. बाजार होत असताना कंपनीचा स्टॉक 32 टक्क्यांच्या प्रीमियमसह 1,431 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर कंपनीचं व्हॅल्यूएशन किंवा मार्केट कॅप सुमारे 57,000 कोटी रुपयांवर पोहोचले होते. सध्या 54,039.38 कोटी रुपयांवर ते दिसत आहे. ही आकडेवारी पाहता तेव्हापासून सुमारे 3,000 कोटी रुपयांचं नुकसानच झाल्याचं दिसतंय. सकाळी 10 वाजता तो लिस्ट झाला. त्यादिवशी 20 टक्के इतका रिटर्न मॅनकाइंडनं आपल्या गुंतवणूकदारांना दिला होता. 1300 रुपयांना तो सूचीबद्ध झाला होता. तर इश्यू प्राइजच्या तुलनेत 20 टक्के वाढीसह एंट्रीदेखील घेतली होती.
चौथी मोठी कंपनी
मॅनकाइंड फार्मा ही देशातली चौथी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. तर विक्रीच्या प्रमाणात तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी विविध क्रॉनिक उपचारात्मक क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनचा विकास, उत्पादन आणि मार्केटिंग करते. विविध ग्राहक आरोग्य सेवा उत्पादनंदेखील कंपनीकडून तयार केली जातात. कंपनीनं आपल्या फार्मास्युटिकलच्या व्यवसायात आपले 36 ब्रँड तयार केलेत. त्या माध्यमातून देशांतर्गत विक्रीमध्ये जवळपास 500 दशलक्ष रुपयांहून अधिकची कमाई कंपनीनं केलीय. भारतातले 80 टक्क्यांहून अधिक डॉक्टर या कंपनीचं फॉर्म्युलेशन लिहून देतात.
देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष
मॅनकाइंड फार्मा या कंपनीची स्थापना 1995मध्ये झाली. रमेश जुनेजा हे कंपनीचे संस्थापक आहेत. मॅनफोर्स कंडोम, गर्भधारणा चाचणी किट प्रीगा न्यूज यासह 36 उत्पादनांचा मॅनकाइंड फार्माच्या मुख्य उत्पादनांमध्ये समावेश आहे. सध्या मॅनकाइंडचं पूर्ण लक्ष देशांतर्गत बाजारपेठेवर आहे. आर्थिक वर्ष 2022च्या आकडेवारीनुसार, कंपनीच्या एकूण महसुलात देशांतर्गत बाजाराचा वाटा तब्बल 97.60 टक्के इतका आहे. करचुकवेगिरीच्या आरोपावरून आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीच्या दिल्लीतल्या कार्यालयावर छापा टाकल्याचं बोललं जातंय. विभागानं कंपनीच्या दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हा छापा टाकला आणि कागदपत्रांची तपासणी केली. यासोबतच काहीजणांची चौकशीही केलीय. याबाबत माध्यमांनी कंपनीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            