कंडोम उत्पादक मॅनकाइंड फार्माचा शेअर आज सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार लिस्ट झाला. कंपनीच्या आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता मॅनकाइंड फार्माचा शेअर प्रीमियमवर लिस्ट होईल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार 20% रिटर्न देऊन मॅनकाइंडने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मालामाल केले. मॅनकाइंड फार्माचा शेअर 1300 रुपयांना सूचीबद्ध झाला. इश्यू प्राईसच्या तुलनेत त्याने 20% वाढीसह एंट्री घेतली.
आज मंगळवारी 9 मे 2023 रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात मॅनकाइंड फार्माचा शेअर सूचीबद्ध झाला. आज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रीय शेअर बाजारात मॅनकाइंड फार्माच्या लिस्टींगचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मॅनकाइंड फार्माचे अध्यक्ष रमेश जुनेजा आणि कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित घंटानाद करुन लिस्टींग करण्यात आले. सकाळी 10.15 वाजता मॅनकाइंड फार्माचा शेअर 1313.05 रुपयांवर ट्रेड करत असून त्यात 21.58% वाढ झाली आहे.
मॅनकाइंड फार्माचा आयपीओ 15 पटीने सबस्क्राईब झाला होता. यामुळे ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माच्या शेअरमध्ये तेजीत आहे. मॅनकाइंड फार्माकडून 3 मे रोजी शेअरचे वाटप करण्यात आले. कंपनी शेअर विक्रीतून 4326 कोटींचे भांडवल उभारणार आहे. या आयपीओसाठी कंपनीला 15 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. कंपनीचा आयपीओ 25 ते 27 एप्रिल 2023 या काळात गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. यासाठी प्रती शेअर 1026 ते 1080 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता.
लिस्टींगच्या पार्श्वभूमीवर ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माचा शेअर 120 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये तो 1300 रुपयांच्या आसपास लिस्ट होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच महिन्यांनी शेअर मार्केटमध्ये एका मोठ्या कंपनीचा आयपीओ आला होता. त्याला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मॅनकाइंड फार्मा इश्यू प्राईसच्या तुलनेत 7 ते 10% प्रीमियमसह सूचीबद्ध होईल, असा विश्वास मेहता सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी व्यक्त केला.
संस्थात्मक गुंतवणूदारांनी 49.16 पट बोली लावली आहे. उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांकडून राखीव शेअर्सपैकी 3.8 पट बोली लावण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव शेअर्सपैकी 92% शेअर्ससाठी अर्ज करण्यात आले आहेत. IPO साठी कंपनीकडे 42.95 कोटी शेअर्सची बोली लागली आहे. आयपीओसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना 3 मे 2023 रोजी मॅनकाइंडकडून शेअरचे वाटप केले जाणार आहे. या भाग्यवान गुंतवणूकदारांना 5 मे रोजी डिमॅट खात्यात शेअर ट्रान्सफर केले जातील.
ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वधारला
आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता मॅनकाइंड फार्माच्या शेअरला ग्रे मार्केटमध्ये मागणी असल्याचे दिसून आले आहे. आज 9 मे 2023 रोजी ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंडचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत 120 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. कंपनीने इश्यू प्राईस 1080 रुपये प्रती शेअर इतकी ठेवली आहे. त्यामुळे 1080 अधिक 120 रुपयांचा प्रीमियम पकडला तर मॅनकाइंड फार्माचा शेअर 1200 रुपयांना लिस्ट होण्याची शक्यता आहे. जो इश्यू प्राईसच्या तुलनेत 11% अधिक असेल. सोमवारी मॅनकाइंड फार्माचा ग्रे मार्केटमधील प्रीमियम 103 रुपये इतका होता.