Mahindra XUV 700 Fault: जर तुमच्याकडे XUV700 कार असेल तर महिंद्रा कंपनीकडून तुम्हाला लवकरच कॉल येण्याची शक्यता आहे. कारण, वायरिंगमधील संभाव्य घोटाळा शोधण्यासाठी कंपनीकडून 1 लाखांपेक्षा जास्त गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच XUV400 गाडीच्या ब्रेकमधील संभाव्य घोटाळा देखील तपासण्यात येणार आहे.
गाड्यांची पुन्हा तपासणी होणार
महिंद्रा कंपनीने SUV श्रेणीतील गाड्यांची पुन्हा तपासणी करणार असल्याची घोषणा काल (18 ऑगस्ट) ला केली. 1 लाख 8 हजार महिंद्रा XUV700 गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तर XUV400 मॉडेलच्या 3,560 गाड्यांमधील संभाव्य ब्रेक इश्यू शोधण्यात येणार आहे.
8 जून 2021 ते 28 जून 2023 च्या दरम्यान ज्या XUV700 गाड्यांची निर्मिती आणि विक्री झाली आहे, या गाड्यांच्या वायरिंमधील संभाव्य घोटाळा तपासण्यात येणार आहे. तर चालू वर्षी (2023) फेब्रुवारी आणि जून महिन्यात निर्मिती केलेल्या XUV400 गाड्यांच्या ब्रेकमधील संभाव्य घोटाळा तपासण्यात येणार आहे.
SUV गाड्यांमध्ये संभाव्य धोका काय?
इंजिनजवळून जाणारी वायरिंग घर्षणामुळे कट होण्याचा धोका होऊ शकतो, असे तपासणीत पुढे आले आहे. त्यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. तर XUV400 गाडीमधील ब्रेकमधील स्प्रिंग नीट काम करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सर्व गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
ग्राहकांना रिपेअरिंगसाठी पैसै द्यावे लागतील का?
तपासणी करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये काही घोटाळा आढळल्यास मोफत नीट करून देण्यात येईल. ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. वाहन मालकांना वैयक्तिक संपर्क करण्यात येणार असल्याचे महिंद्रा कंपनीने म्हटले आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने स्कॉर्पिओ आणि XUV700 श्रेणीतील सुमारे 19 हजार गाड्या माघारी बोलवल्या होत्या. इंजिनच्या बेल हाऊसिंग भागातील रबरसंबंधित तांत्रिक अडचण असल्याचे पुढे आले होते.
महिंद्रा कंपनीने जुलै महिन्यात SUV गाड्यांच्या विक्रीत 30% वाढ नोंदवली. जुलै महिन्यात कंपनीने 36,205 गाड्यांची विक्री केली. 2023-24 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत चांगल्या SUV च्या विक्रीमुळे कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 98% जास्त नफा कमावल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.