भारतात G20 परिषदेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये देशभरातील हस्तकला उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हस्तकला बाजाराचे (Crafts Bazaar)आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन या योजनेच्या माध्यमातून GI मानांकन मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तुचा या बाजारामध्ये समावेश करण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साडीचे सादरीकरण करण्यात आले होते.
प्रदर्शन-सह-विक्रीचे नियोजन
जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील प्रगती मैदानात उभारण्यात आलेल्या भारत मंडपम या ठिकाणी हा 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत क्राफ्ट्स बाजार सुरू करण्यात आला होता. यामध्ये भारतातील विविध भागांतील हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन-सह-विक्रीचे नियोजन करण्यात आले होते. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक हस्तकला उत्पादनांना जागतिक बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी या क्राफ्ट बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सुमारे 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील हस्तकला निर्मित उत्पादनांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातून कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साडी प्रदर्शित करण्यात आली होती. या परिषेदेसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी या क्राफ्ट्स बाजाराला भेटी दिल्या.
महाराष्ट्रातून कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी-
क्राफ्ट बाजार या प्रदर्शनासह विक्री च्या उपक्रमामध्ये एक जिल्हा एक उत्पादन असा समावेश करण्यात आला होता. यासाठी जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादनाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून जगात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साडीचा समावेश करण्यात आला होता. अत्यंत बारकाईने हाताने बनवलेल्या कातडी चप्पल कोणत्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच ‘महाराष्ट्र राज्याचे महावस्त्र’ म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी, शुद्ध रेशीम आणि सोनेरी जरीमध्ये विणलेल्या पैठणीचा देखील या क्राफ्ट बाजारात समावेश करण्यात आला होता.
जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी
भारत सरकारने जी-20 परिषदेचे आयोजन करत असताना हस्तकला बाजाराच्या माध्यमातून भारतातीव पारंपरिक आणि हस्तकला निर्मित उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. या प्रदर्शनाममध्ये जीआय मानांकन मिळालेल्या सुप्रसिद्ध वस्तुंच्या सादरीकरणासोबत विक्रीही उपलब्ध करून देण्यात आली होती. वेगवेगळ्या राष्ट्राचे प्रमुख या ठिकाणी भेट देणार असल्याने या माध्यमातून भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी मिळावी हा या मागचा हेतू होता.