विमानतळाचा ज्या पद्धतीनं विकास करण्यात येतोय, त्याचप्रमाणे एसटी स्थानकांचाही विकास करण्यात येणार आहे. एसटी ही सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या माध्यमातून सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा एसटीचा प्रयत्न आहे. राज्य सरकारनं एसटी स्थानकांचं रूपच बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर तरतूदही करण्यात आलीय. 2023-24च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 402 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केलीय.
Table of contents [Show]
जवळपास 580 बसस्थानकं
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीतून दररोज सुमारे 55 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातल्या विविध ठिकाणी बसस्थानकं आहेत. एसटी महामंडळाची एकूण 580 बसस्थानकं राज्यभरात आहेत. त्यात वाढही होणार आहे. ही बसस्थानकं अद्ययावत करणं गरजेचं आहे. एकूण 580 बसस्थानकांपैकी 227 बसस्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्यात नूतनीकरण, पुनर्बांधणी आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. 49 बसस्थानकांचं काम तर पूर्णही झालंय. इतर बसस्थानकांचा विकास करण्याच्या दृष्टीनं आता कामाला सुरुवात झालीय.
400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
बसस्थानकांच्या विकासासाठी जो निधी हवाय त्या संदर्भात महामंडळानं मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवलाय. सरकारनं 2023-24च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून ठेवलीय. त्यामुळे हा निधी मिळण्याच्या संदर्भानं महामंडळानं राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. आतापर्यंत 49 बसस्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, 2015पासून 17.5 टक्क्यांपैकी 10 टक्के रक्कम आपलं भांडवली अंशदान म्हणून सरकार एसटी महामंडळाला खर्चासाठी देतं. बसस्थानकांचा पुनर्विकास यासह एसटीची विविध काम याच निधीतून केली जात असतात.
बसस्थानकात विविध स्टॉल्स
2015पासून 2022 या कालावधीचा विचार केल्यास जवळपास 520 कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळाले आहेत. या निधीचा वापर 179 बसस्थानकांच्या पुनर्विकासासाठी केला जाणार होता. त्याप्रमाणे आतापर्यंत 49 बसस्थानकं तर बांधून पूर्ण झाली आहेत. काही बसस्थानकांचं काम सुरू आहे. बसस्थानकाचं मुख्य काम यासह विविध सुविधा यात समाविष्ट आहेत. जसं की, उपहारगृह, स्वच्छता गृह, बुक स्टॉल, फ्रुट स्टॉल इतर छोट्या-मोठ्या स्टॉल्सची सुविधा दिली जाणार आहे. आधी बसस्थानकाच्या परिसरात केवळ एक रसवंती गृह असायचं. आता इतरही स्टॉल्स उभे केले जातील. यामुळे एसटीच्या महसुलातही वाढ अपेक्षित आहे.
हिरकणी कक्ष
एसटी स्थानकांमध्ये विविध सुविधांतर्गत ही एक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या महिला दिनापासून याची सुरुवात करण्यात आली. स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करताना कोणतीही अडचण येवू नये, म्हणून ही सुविधा दिली जाणार आहे. सध्या पुण्यातल्या शिवाजीनगरच्या वाकडेवाडी बसस्थानकात हा कक्ष सुरू करण्यात आलाय. हळूहळू राज्यभरात असा कक्ष सुरू करणार असल्याचंही महामंडळातर्फे सांगण्यात आलंय. एक बेड, पाळणा, ब्लँकेट आणि इतर सुविधा या कक्षामध्ये असणार आहेत.