एमएसआरटीसी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (Maharashtra State Road Transport Corporation) यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 जून 1948ला पुणे ते अहमदनगर या मार्गाला सर्वात पहिल्यांदा हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. आज गावागावात एसटीची सुविधा महामंडळामार्फत पुरवली जाते. या माध्यमातून एसटीला मोठा महसूलदेखील मिळत असतो. अलिकडेच सरकारनं सवलतीदेखील जाहीर केल्यात. प्रवासी संख्या वाढल्यास महसुलात अधिक वाढ होणार आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला तसंच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सवलती आहेत. विद्यार्थिनींना मासिक पासमध्ये सवलत, महिलांना अर्ध तिकीट, या सुविधांमुळे प्रवासीसंख्या वाढलीय. त्यामुळे एसटीचं उत्पन्नही वाढलं आहे.
Table of contents [Show]
विविध जिल्हे आणि आगारे
गाव तिथे एसटी ही संकल्पना पूर्णत्वात आणण्यासाठी एसटीनं राज्यातल्या विविध जिल्ह्यांत आगारांची उभारणी केली. त्यानुसार गावोगावी एसटी स्थानकं उपलब्ध झाली. प्रामुख्यानं 6 विभाग करण्यात आले. यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. मुंबई विभागांतर्गत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आगारे येतात. पुण्यांतर्गत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आगारं येतात. नाशिक विभागात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आगारे समाविष्ट आहेत.
महसूल मिळवून देणारे आगार
मराठवाड्यातल्या विभागात औरंगाबाद एक मोठा महसूल मिळवण्याचे आगार म्हणजे औरंगाबाद आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, उस्मानाबाद, लातूर आगारे येतात. विदर्भातल्या अमरावती विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ आगारे येतात. तर नागपूर विभागात नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा इत्यादी आगारं येतात. राज्य सरकार मार्ग परिवहन निगम कायदा 1950अंतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे. याअंतर्गत एकूण 250 बस डेपो त्याचप्रमाणे 588 बस स्टँड आहेत. तर 1,04,000 कर्मचारी एसटीच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देत आहेत. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी या संकल्पनेवर आधारित ही सेवा दिली जात आहे.
सामान्यपणे उत्पन्न किती?
गावोगावी पोहोच असलेल्या एसटीला अलिकडच्या काळात मोठा महसूल मिळत आहे. एसटीचं दैनंदिन उत्पन्न साधारणपणे 22 कोटींहून अधिक नोंदवलं जातं. मध्यंतरी कोविडच्या काळात त्यात घट झाली होती. प्रवाशांच्या बाबत जर बोलायचं झालं तर सुमारे 70 लाखांहून अधिक प्रवासी दररोज एसटीनं प्रवास करतात. सरासरी 18,000 बसेसचा ताफा एसटी महामंडळाकडे आहे. यात लालपरीसह अश्वमेध, शिवनेरी, शिवनेरी (इलेक्ट्रिक), शिवशाही, हिरकणी, विठाई अशा विविध प्रकारच्या बसेसच्या माध्यमातून एसटी महामंडळ सेवा पुरवत आहे. पुणे ते अहमदनगर या दरम्यान पहिला एसटी धावली होती. त्याच पार्श्वभूमीवर 1 जून 2022ला एमएसआरटीसीनं पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई'ला देखील हिरवा झेंडा दाखवला होता.
प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी
एसटी ही गावागावात पोहोचण्याची आणि त्याला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाची अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे परवडणारा प्रवास आणि सुरक्षिततेची हमी. एसटी हे राज्यातल्या विविध महामंडळांपैकी एक आहे. दुर्दैवानं काही अनुचित प्रकार घडला, अपघात झाला, तर शासनातर्फे याची तत्काळ दखल घेतली जाते. विमा तसंच इतर सुविधा प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जातात.
पैशांचा अपव्यय टाळण्याचा पर्याय
एसटी प्रवास हा पैशांचा अपव्यय टाळण्याचा एक चांगला पर्याय आहे. स्वस्त दरात एसटी प्रवाशांना सेवा पुरवत असते. एकीकडे खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची अक्षरश: लूट होत असल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. त्यातही सुट्ट्यांचा हंगाम असेल तर खासगी वाहनचालक, ट्रॅव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं जातं. नाईलाजानं अनेक प्रवाशांना ते द्यावं लागतं. शिवाय सुरक्षिततेचीदेखील कोणतीही हमी नसते. अशावेळी एसटी आपल्या विविध प्रवास पर्यायाच्या माध्यमातून सेवा देत असते. ठरलेलं भाडं शिवाय एसटीच्या कोणत्या योजनेस पात्र असाल तर ती योजना गृहीत धरता प्रवाशांच्या पैशांची मोठी बचत होते. ग्रामीण भागातल्या प्रवाशांना एसटीचा मोठा आधार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही.
प्रत्येक थांब्यावर थांबावी बस
प्रत्येक गावात तसंच लहान थांब्यावर एसटी थांबवली जावी. या माध्यमातून कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, हा उद्देश यामागे आहे. मात्र काही चालक लहान थांब्यांवर एसटी थांबवत नसल्याचं काहीवेळा पाहायला मिळतं. अशावेळी तक्रार करण्याचं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलंय. गाव तिथे एसटी या संकल्पनेला कुठेही धक्का लागू नये, हाच महामंडळाचा उद्देश आहे.