नवीन घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी आता अवघे चारच दिवस शिल्लक आहेत. येत्या 1 एप्रिल 2023 पासून राज्यात दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्क 1% ने वाढण्याची शक्यता आहे. स्टॅम्प ड्युटीबरोबरच रेडी रेकनरचे देखील सुधारित एप्रिलपासून लागू होणार असल्याची चर्चा सध्या वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. (Maharashtra Govt may consider proposal of Stamp duty hike by 1 percent)
या महिन्याच्या सुरुवातीला राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केला होता.आर्थिक वर्ष 2023-24 करिता राज्यात महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीवरील सवलत कायम ठेवण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र राज्य सरकार स्टॅम्प ड्युटीचा दर वाढवण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. राज्यात स्टॅम्प ड्युटी 1% ने वाढल्यास ग्राहकांसाठी घर, फ्लॅट, जमीन खरेदी व्यवहारात दस्त नोंदणीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
राज्याला सध्या कर महसुली तुटीचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारला जीएसटीचा केंद्र सरकारकडून परतावा मिळतो. त्याचबरोबर स्टॅम्प ड्युटी, इंधन विक्री, सिगरेट आणि मद्य विक्रीवर राज्याच्या तिजोरीत कर जमा होतो.मात्र सरकारची तूट फुगत असल्याने महसूल वाढवण्यासाठी सरकार कर वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ज्यात स्टॅम्प ड्युटी वाढवण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात स्टॅम्प ड्युटी वाढण्याच्या वृत्ताने बांधकाम उद्योगाला धडकी भरली आहे.स्टॅम्प ड्युटीमध्ये वर्ष 2020 नंतर टप्याटप्याने वाढ झाली होती. आता पुन्हा दरवाढ झाल्यास ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो. आधीच रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीने बँकांचा गृह कर्जाचे व्याजदर प्रचंड वाढले आहे. त्यातच राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि रेडी रेकनरचा दर वाढवला तर रिअल इस्टेट क्षेत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या किती आहे स्टॅम्प ड्युटी? (Stamp Duty Rate in State)
सध्या राज्यात महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात वेगवेगळा स्टॅम्प ड्युटीचा दर आहे. मुंबईत स्टॅम्प ड्युटी 6% आहे. ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांत दस्त नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटीचा दर 7% आहे. काही ठिकाणी स्थानिक संस्था कर आणि शहर अधिभार असा 1% लागू केला जातो. अशा परिक्षेत्रात दस्त नोंदणीसाठी 8% स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. राज्यात महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये खास सवलत आहे. घर किंवा फ्लॅटची दस्त नोंदणी महिलेच्या नावे केली तर महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये 1% कर सवलत आहे.
स्टॅम्प ड्युटी 1% ने वाढल्यास किती खर्च वाढेल? (How Much Cost Increased If Stamp Duty Hike by 1% )
स्टॅम्प ड्युटी 1% ने वाढल्यास घराच्या नोंदणीचा खर्च वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या बाजार मूल्यावर स्टॅम्प ड्युटीचा दर आकारला जातो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांत प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत. या शहरांत फ्लॅटच्या किंमती 40 ते 50 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत आहेत. टू-बीएचके, थ्री-बीएचके, डुप्लेक्स फ्लॅटवर प्रिमीयम देखील भरावा लागतो. 30 लाखांचा फ्लॅट घेतल्यास 1% स्टॅम्प ड्युटी दरवाढीने 30000 रुपये वाढू शकतात. अशाच प्रकारे 50 लाखांच्या प्रॉपर्टीच्या दस्त नोंदणीसाठी 1% जादा स्टॅम्प ड्युटी म्हणून 50000 रुपयांचा अतिरिक्त खर्च ग्राहकाला करावा लागू शकतो.
स्टॅम्प ड्युटीचे चालू वर्षाचे टार्गेट पूर्ण? (Stamp Duty Targets Complete)
स्टॅम्प ड्युटीचे चालू वर्षाचे टार्गेट केव्हाच पूर्ण झाले आहे.राज्यात मागील सहा महिन्यात स्थावर मालमत्ता क्षेत्रात प्रचंड तेजी दिसून आली आहे. विशेषत:मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीचे व्यवहार वाढल्याचे दिसून आले.दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कापोटी आतापर्यंत सरकारला 32000 कोटींहून अधिक कर महसूल मिळाला आहे. यात गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 10% वाढ झाल्याचे बोलले जाते.
(News Source : Housing.Com, TOI, FPJ)