कार खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहक जास्त पैसे खर्च करायला तयार असल्याचा एक अहवाल नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये वाहनांच्या किंमती वाढत असल्यातरीही चांगली फिचर्स असलेली गाडी घरी आणण्यासाठी भारतीय तयार असल्याचे म्हटले होते. आता लक्झरी श्रेणीमधील कारची विक्री चालू वर्षात उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2022 वर्षातही लक्झरी कार विक्रीने भारतात उच्चांक गाठला होता. हा विक्रम चालू वर्षात मोडीत निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चालू वर्षी सर्वाधिक लक्झरी गाड्यांची विक्री (Highest luxury car sale in current year)
लक्झरी श्रेणीतील गाड्यांच्या किंमती कोट्यवधींमध्ये असल्याने त्यांची विक्री ठराविक श्रीमंत वर्गापर्यंत मर्यादित असते. एकूण कारविक्रीपैकी आलीशान कार विक्रीचा वाटा जेमतेम 1 टक्का आहे. मात्र, जॅग्वार, मर्जेडिझ बेन्स, स्कोडा, फरारी यासंह अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. मागील वर्षी भारतात 37 ते 38 हजारांच्या दरम्यान आलीशान कार विकल्या गेल्या. कोरोनानंतरची ही सर्वांत चांगली आकडेवारी होती. याआधी 2018 साली 40 हजार 863 गाड्यांची विक्री झाली होती. मात्र, कोरोनामुळे आलिशान गाड्यांची विक्री रोडावली होती. आता पुन्हा एकदा चालू वर्षात मागील सर्व विक्रम मोडीत निघतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
2023 वर्षात आलिशान कार विक्रीचा अंदाज (Luxury car sale estimate of 2023)
चालू वर्षात सुमारे 42 हजार ते 45 हजार गाड्यांची विक्री होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. चालू वर्षात आलिशान गाड्यांची अनेक नवनवीन मॉडेल्सही बाजारात येणार आहेत. दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे अधिक ग्राहक या महागड्या मॉडेल्सकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे.
लक्झरी कार विक्री वाढण्यामागील कारण (Reason behind luxury car sale hike in India)
कॉर्पोरेट कंपन्यांच्या उत्पन्नांतील वाढ आणि आर्थिक विकासामुळे लक्झरी गाड्यांची विक्री वाढत आहे. कारण, लक्झरी सेगमेंटमधील गाड्यांना उद्योगपती, टॉप कोर्पोरेट्स हेड आणि सेलिब्रिटिंकडून मागणी असते. जगभरात अस्थिरता असतानाही भारतामध्ये मात्र, वाहन क्षेत्रासाठी अच्छे दिन येणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
मर्सिडिझ लाँच करणार दहा न्यू मॉडेल्स (Mercedeez will launch 10 new models in 2023)
बाजारापेठेत सर्वात जास्त लक्झरी गाड्यांची विक्री करणार असल्याचा निर्धार मर्सिडिझ बेंन्झने व्यक्त केला आहे. सध्या कंपनीकडे 6 हजार लक्झरी गाड्यांची बुकिंग पेंडिग आहे. येत्या काळात आणखी मागणी वाढण्याची शक्यताही कंपनीने व्यक्त केली आहे. चालू वर्षात मर्जेडिझ बेन्झ दहा नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे. BMW, ऑडी, लेक्सस या कंपन्यांनीही विक्रीत दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतातील लक्झरी कारची विक्री 25 ते 30% वेगाने वाढेल, असे एस अँडपी ग्लोबल मोबिलिटीने केलेल्या अहवालात म्हटले आहे.