Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toll Plaza: टोल प्लाझावर आता लागणार नाहीत वाहनांच्या लांबच लांब रांगा, सरकारनं उचललं पाऊल

Toll Plaza: टोल प्लाझावर आता लागणार नाहीत वाहनांच्या लांबच लांब रांगा, सरकारनं उचललं पाऊल

Image Source : www.businesstoday.in

Toll Plaza: टोल प्लाझावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि यामुळे होणारा वेळेचा तसंच पैशांचा अपव्यय आता कमी होणार आहे. शुक्रवारी राज्यसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल प्लाझाच्या वेळेवरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टोल प्लाझावरची (Toll Plaza) वाहनांच्या रांगा ही मोठी समस्या आहे. याविषयी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी या खात्याचे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की देशातल्या टोलनाक्यांवर लागणारा सरासरी वेळ कमी झाला आहे. ही प्रतीक्षा वेळ सरासरी 734 सेकंद होती. मात्र आता ती 47 सेकंदांपर्यंत खाली आली आहे. इंदौरचे भाजपा खासदार शंकर ललवानी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना टोलनाक्यावरच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याला उत्तर देताना गडकरी यांनी सरासरी वेळेत मोठी घसरण झाल्याची माहिती दिली आहे.

फास्टॅगनंतर अधिक टोल वसुली

विशेष म्हणजे भाजपा आमदार शंकर ललवानी यांनी परिवहन मंत्र्यांना टोलनाक्यावरच्या वेळेबाबत प्रश्न विचारला होता. यासोबतच टोल प्लाझावरच्या वाहतूक कोंडीवर सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी केला होता. यासाठी काही नवीन यंत्रणा विकसित केली जात आहे का, अशी त्यांची विचारणा होती. राज्यसभेत या प्रश्नाला लेखी उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, की राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग बसवल्यानंतर टोलनाक्यांवर वसुलीत वाढ झाली आहे. मात्र काही वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे टोलनाक्यांवर लांबच लांब रांगा लागतात.

सरासरी वेळेत घट

यासोबतच परिवहन मंत्र्यांनी सांगितलं, की टोल प्लाझामध्ये फास्टॅग बसवल्यानंतर टोलनाक्यावरच्या सरासरी वेळेत घट झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) याविषयी सर्वेक्षणदेखील केलं आहे. या सर्वेक्षणात असं समोर आलं आहे, की आधी वाहनांसाठी साधारणत: 734 सेकंद लागायचे. मात्र आता ही वेळ 47 सेकंदांपर्यंत खाली आली आहे.

नवी सिस्टीम?

यासोबतच नितीन गडकरी यांनी असंही सांगितलं, की लवकरच देशात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमवर (GNSS) आधारित गेट-फ्री प्लाझा तयार करण्यात येतील. यामुळे लोकांना जास्त वेळ टोल प्लाझामध्ये थांबावं लागणार नाही. या प्रणालीवर काम करण्यासाठी सरकारनं सल्लागारदेखील नेमला आहे, असं ते म्हणाले.

सर्वसामान्यांची नाराजी

एकीकडे सरकार ही वेळ कमी होणार असल्याचं सांगत असलं तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे इंधनाचा आणि पर्यायानं पैशांचा अपव्यय होत असल्याबद्दल सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इंधनाचे भाव गगनाला भिडत असताना टोलचा आकडाही भलामोठा असल्यानं आणि तो भरण्याशिवाय पर्याय नसल्यानं ही नाराजी वाढत चालली आहे. याविषयी मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही.