अनेकदा तुम्ही टोल नाक्यावर 10 मिनिटे, 15 मिनिटे रांगेत वाहन घेऊन उभे राहिला असाल. कधी सुट्टे पैसे देण्यासाठी लोक वेळ लावतात किंवा फास्टॅग मध्ये तांत्रिक अडचणी येतात म्हणूनही वेळ खर्च होतो. नेमक्या घाईच्या वेळी तर असे प्रकार अनेकदा घडतात. तुम्हा सगळ्यांनी कधी न कधी अशा परिस्थितीचा सामना केलाच असेल. परंतु जर टोल नाक्यावर तुम्हांला फास्टॅग स्कॅनसाठी 10 सेकंदापेक्षा अधिक वेळ वाट पहावी लागत असेल तर तुम्ही एक पैसा देखील न देता टोल नाक्यावरून प्रवास करू शकता! काय म्हणता, विश्वास बसत नाहीये? चला तर जाणून घेऊया काय आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा स्पेशल नियम, जो प्रत्येक भारतीयाला माहिती असायलाच हवा.
10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ झाला तर...
टोल प्लाझावर किमान प्रतीक्षा वेळ सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर पीक अवर्समध्ये म्हणजे जेव्हा रहदारी मोठ्या प्रमाणात असते, तेव्हा देखील प्रत्येक वाहनाची फास्टॅग स्कॅनिंग सेवा वेळ 10 सेकंदांपेक्षा जास्त नसावी आणि यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. स्वतः भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 26 मे 2021 साली जाहीर केलेल्या एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. देशभरातील प्रत्येक टोलनाक्यावर प्रतीक्षा वेळ सुनिश्चित करण्यासाठी ठेकेदारांना आता काळजी घ्यावी लागणार आहे.
वाहतूक व्यवस्थापन आणि दळणवळणात नाविन्यपूर्ण प्रयोग
रस्ते आणि वाहतूक खात्याचे केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी जेव्हापासून जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून त्यांनी वाहतूक व्यवस्थापनात आणि दळणवळणाच्या नियमांत अनेक प्रयोग केले आहेत. फास्टॅग हा देखील याच एका प्रयोगाचा भाग होता. टोलनाक्यावरील रांगा कमी व्हाव्या आणि आर्थिक फेरफार होऊ नये यासाठी डिजिटल टोल आकारणी फास्टॅगच्या माध्यमातून होऊ लागली आहे. परंतु फास्टॅगमध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.फास्टॅग स्कॅनर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घेणे हे टोलनाका चालविणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे, त्यामुळे टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅनिंग तुमचा 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ वाया जात असेल तर तुम्हांला पैसे देण्याची गरज नाहीये.
NHAI ने जारी केलेले मार्गदर्शक तत्वे
- टोल प्लाझावर वाहनांना 100 मीटरपेक्षा जास्त रांगेत उभे न ठेवता वाहतुकीचा अखंड प्रवाह सुनिश्चित करावा लागणार आहे.
- 100% फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर बहुतांश टोलनाक्यांवर प्रतीक्षा करण्याची वेळ नसली तरीही काही कारणास्तव 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्यास टोल न भरता वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाईल.
- टोल बूथपासून 100 मीटरच्या अंतरावर असलेल्या वाहनांना ही सुविधा मिळेल.
- यासाठी प्रत्येक टोल नाक्यामध्ये टोल बुथपासून 100 मीटर अंतरावर एक पिवळी रेषा चिन्हांकित करावी लागेल.
टोल प्लाझा चालकांना आपल्या कामाचे उत्तरदायित्व कळावे यासाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू केली गेली आहेत असे पत्रकात म्हटले आहे. NHAI ने फेब्रुवारी 2021 च्या मध्यापासून देशभरात 100% कॅशलेस टोलिंग यशस्वीरित्या राबवले आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) चे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, एक कार्यक्षम टोल वसुली यंत्रणा तयार करण्यासाठी पुढील 10 वर्षांच्या वाहतुकीच्या अंदाजानुसार नवीन डिझाइन तयार करण्यावर आणि आगामी टोल प्लाझा बांधण्यावर सरकारद्वारे भर देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा कधी तुम्हाला टोल बूथपासून 100 मीटरच्या अंतरावर असूनही 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर तुम्ही तेथून अगदी फुकटात प्रवास करू शकता. जर टोल प्लाझा वरील कर्मचारी तुमच्याशी हुज्जत घालत असतील तर सरळ 1033 या NHAI च्या हेल्पलाईनवर संपर्क करून तक्रार दाखल करू शकता. तुमच्या तक्राराची लगेच दखल घेतली जाते आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाते.
काय मग, आहे की नाही ही तुमच्या फायद्याची बातमी? तेव्हा अशाच माहितीपर लेखांसाठी ‘महामनी’ला फॉलो करा आणि ही बातमी तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील पाठवा.