• 07 Dec, 2022 09:58

Lijjat Papad Success story : 80 रुपयांपासून सुरू झालेला बिझनेस आज 1600 कोटींवर पोहचला!

Lijjat Papad Success Story

Lijjat Papad : गिरगावातील एका छोट्या जागेत अवघ्या 80 रुपयांच्या भांडवलावर महिलांनी सुरू केलेला उद्योग आज 1600 कोटींवर पोहचला. विशेष म्हणजे या व्यवसायात सहभागी असलेल्या महिला या कंपनीच्या भागीदार आहेत.

लिज्जत पापड हे भारतातील प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी एकदा तरी या पारंपरिक स्नॅकस, अस्सल मराठीत सांगायचं झालं तर पापडाचा आनंद लुटला असेलच. अवघ्या 7 महिलांनी एकत्रित येऊन गप्पा-टप्पांमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय आज एका अभूतपूर्व ब्रँडची यशोगाथा बनली आहे. या लिज्जत पापडच्या निर्मितीमागील प्रेरणादायी यशोगाथा बऱ्याज जणांना माहिती ही नसेल. या व्यवसायाची सुरूवात अवघ्या 80 रुपयांपासून सुरू झाली होती. आज हा व्यवसाय 60 वर्षांनंतर 1,600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या व्यवसायात 45 हजार महिला सहभागी असून त्या फक्त काम करत नाहीत तर या व्यावसायातील भागीदार आहेत आणि त्या दररोज 4.8 दशलक्ष पापड बनवतात.

गोष्ट लिज्जत कुर्रम कुर्रम पापडाची...

[media url="https://www.youtube.com/watch?v=f23vj-H4DrA"][/media]

सध्या कोट्यवधींची उलाढाल असलेला हा घरगुती उद्योग महिला कामगार सहकारी संस्थेच्या नावाने सुरू आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, लिज्जत पापडसारखा गृह उद्योग त्याकाळात फक्त 80 रुपयांमध्ये सुरू झाला होता. जो आज 1600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. जसवंतीबेन जमनादास पोपट यांनी सुरू केलेल्या गृहउद्योगात आज 45 हजार महिला रोजगार करत आहेत आणि त्यातून त्या त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहदेखील करत आहेत. या प्रेरणादायी प्रवासामुळे जसवंतीबेन यांना भारत सरकारने प्रतिष्ठित अशा पद्मश्री पुरस्काराने 2021 मध्ये सन्मानित केले.

7 महिलांना सुरू केलेला ‘लिज्जत’दार प्रवास

1959 मध्ये मुंबईतील गिरगावात राहणाऱ्या 7 महिलांनी एकत्रित येऊन हा व्यवसाय सुरू केला होता. त्यात जसवंतीबेन जमनादास पोपट या आघाडीवर होत्या. त्यांच्यासोबत पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन. एन तन्ना, लगुबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन व्ही विठ्ठलानी आणि दिवाळीबेन लुक्का या होत्या. या महिलांनी पापड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल विकत घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते छगनलाल करमसी पारेख यांच्याकडून उद्योग सुरू करण्यासाठी 80 रुपये कर्ज घेतले होते. या पैशातून त्यांनी कच्चा माल विकत घेतला आणि पापड बनवण्यास सुरूवात केली. पण त्यांचा तो पहिला प्रयत्न फसला. पण त्यांनी हार न मानता नेटाने व्यवसाय सुरू ठेवला आणि वर्षभरात त्यांनी या व्यवसायातून 6 हजारांपेक्षा जास्त किमतीचे पापड विकले. तर 1962 मध्ये त्यांनी त्यांच्या प्रोडक्टला 'लिज्जत' हे नाव दिले. त्यावेळी त्यांची पापडाची एकूण विक्री दोन लाखांच्या आसपास गेली होती.

देशभरात 80 हून अधिक शाखा

लिज्जत पापडाच्या या व्यवसायात हळुहळू शेकडोने आणि नंतर हजारोने महिला सहभागी झाल्या. या महिलांना फक्त रोजगारच नाही मिळाला तर या व्यवसायात सभासद म्हणून वाटा ही देण्यात आला. आज या महिलांची संख्या 45 हजारांवर पोहोचली. गेल्या 60 वर्षांच्या काळात लिज्जत पापडच्या देशभर 80हून अधिक शाखा आहेत. लिज्जतचे पापड अमेरिका, सिंगापूर या देशांमध्येही पाठवले जातात.

जसवंतीबेन 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

President Kovind presents Padma Shri to Smt. Jaswantiben Jamnadas Popat
2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते जसवंतीबेन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ( Image Source:Twitter)   

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, लिज्जत पापड व्यवसायाच्या सह-संस्थापक आणि 90 वर्षीय जसवंतीबेन जमनादास पोपट यांना तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind, Former President of India) यांच्या हस्ते प्रतिष्ठित अशा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
व्यवसायाने महिलांना सक्षम केले

लिज्जत पापड व्यवसायात सहभागी असलेली प्रत्येक महिला सदस्य ही तिच्या पापड बनवण्याच्या क्षमतेनुसार आणि संस्थेतील स्थानानुसार स्वत: पैसे मिळवते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. ही या व्यवसायातील ताकद आहे. महिलांनी एकत्रित येऊन महिलांसाठी सुरू केलेला हा व्यवसाय एक प्रेरणादायी प्रवास आहे. लिज्जत पापड समूहाने यात आणखी एक प्रगतीचं पाऊल टाकत या व्यवसायात चालक, दुकान सहाय्यक आणि मदतनीस म्हणून पुरुषांनाही संधी दिली.