Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC @75 : 'एसटीच्या सवलत पासमुळेच आज आयुष्य वेगळ्या वळणावर...' नागपुरातला विद्यार्थी सांगतोय एसटीचं महत्त्व

MSRTC @75

MSRTC @75 : 1 जूनला आपल्या लालपरीला 75 वर्ष पूर्ण झालेत. या 75 वर्षात लालपरीने प्रत्येकाच्या आयुष्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात तर एसटीला फार महत्त्वाचे स्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने एसटी बसच्या सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात एसटीचे महत्त्व...

MSRTC @75 : शिक्षणाच्या संघर्षात यश मिळवण्यासाठी अनेक मार्गांनी विद्यार्थ्यांना मदत झाल्याच्या चर्चा आपण खूप ऐकल्यात. पण, एसटी बसच्या सहकार्याने एखाद्याचे शिक्षण पूर्ण झाले. याबाबत फार कमी ऐकण्यात आले आहे. 1 जूनला आपल्या लालपरीला 75 वर्ष पूर्ण झालेत. या 75 वर्षात लालपरीने प्रत्येकाच्या आयुष्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात तर एसटीला फार महत्त्वाचे स्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने एसटी बसच्या सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात एसटीचे महत्त्व. 

नागपूर जिल्ह्यातील 'खैरगाव' या गावातील पत्रकारीतेचे शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रज्ज्वल बनाईत. बारावी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं म्हटलं तर घरची परिस्थिती सुद्धा जेमतेमच होती. प्रज्ज्वलला पत्रकारितेमध्येच आपलं करिअर करायचं होतं. त्याने नागपूर, अमरावती, वरुड येथील कॉलेजमध्ये चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की, प्रत्येक कॉलेजमध्ये journalism course ची फी खूप जास्त आहे आणि ती आपल्याला परवडणारी नाही. अशातच आणखी चौकशी केली असता त्याला माहिती मिळाली की, वरुड येथील कॉलेजमध्ये स्कॉलरशिपच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात journalism course करता येऊ शकतो. तिथे प्रज्ज्वल ने प्रवेश घेऊन आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

education-with-the-cooperation-of-st-bus-internal-image.jpg
IIMC मध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असतांना प्रज्वल 

'प्रवासासाठी पैसे मागणं मला लाजिरवाणं वाटत होतं'

'महामनी'ने प्रज्ज्वलसोबत चर्चा केली असता तो सांगतो की, माझं स्वप्न होतं आपण पत्रकारिता क्षेत्रातच करिअर करावं. त्या दिशेने मी प्रयत्न सुद्धा केले. बारावीपर्यंत चांगला अभ्यास करून मी पदवीला प्रवेश घेतला. पण, तेव्हा प्रॉब्लेम असा झाला होता, जवळपास एकही journalism course कोर्स असलेलं कॉलेज नव्हतं. मग चौकशी करून माहित झालं की नागपूर, अमरावती, वरुड या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाही. मग मी वरुड येथे पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

मग प्रश्न होता तो म्हणजे, प्रवास खर्चाचा. आईवडील दोघेही शेतमजुरी करायचे, लहान बहीण शिक्षणाची, अशात घरी प्रवासासाठी पैसे मागणं मला लाजिरवाणं वाटत होतं. पण पर्याय नव्हता, काही दिवस घरी पैसे मागूनच पास काढली आणि प्रवास पूर्ण केला. 

'एसटीच्या पास सवलतीमुळे 3000 रुपयांची बचत' 

एसटीच्या पासची किंमत 900 रुपये होती. खासगी वाहनाने प्रवास केला असता किंवा सवलत पास घेतली नसती तर मला महिन्याला 4000 रुपये खर्च करावे लागले असते. त्या एसटीच्या सवलत पास मुले माझी  3000 रुपये बचत होतं होती. बरेच दिवस घरी पैसे मागितले आणि एक दिवस असा आला की तेव्हा घरून बाबा पैसे देण्यासाठी नाही म्हणाले, त्यांच्याकडे तेव्हा पैसे नव्हतेच. राहतं घर सुद्धा पडायला झालं होतं. घरी आधीच टेंशन आणि मी जर पैसे मागितले तर आणखी त्यात वाढ होणार या विचाराने मी निर्णय घेतला, आता स्वतः मेहनत घ्यायची. त्यानंतर मी माझ्या शेतात भाजीपाला लागवड केली.

'भाजीपाला विकून पासचे पैसे जमवत होतो' 

शेती काही जास्त नव्हती. 2 एकर शेती पैकी 1 एकरमध्ये मी भाजीपाला म्हणजेच, पालक, मेथी, गोबी, शेंगा याची लागवड केली. कॉलेजला जायचं तिकडून आलं की शेतात बघायचं. माझ्या आईने यात मला खूप मदत केली. माझ्याबरोबर ती सुद्धा उन्हातान्हात शेतात काम करत होती. मी पिकावलेला भाजीपाला गावातील आठवडी बाजारात मी विकायला घेऊन जातं होतो. त्यातून मिळणारे पैसे शिक्षणासाठी वापरत होतो. त्याचबरोबर मी कुरकुरे (बल्ले बल्ले) सुद्धा विकत होतो. सायंकाळच्या वेळी आई मला सर्व करून द्यायची आणि मी गावात सायकल घेऊन ते विकून पैसे कमावत होतो.

'बचतीच्या पैशातून कम्प्युटर कोर्स केलेत' 

भाजीपाला आणि कुरकुरे विकून मिळालेल्या पैशात मी माझ्या प्रवास खर्च भागवत होतो. अशातच एक विचार आला की, एसटीची सवलत पास नसती तर आज मी शिक्षण घेऊ शकलो नसतो. माझी दर महिन्याला 3000 रुपये बचत होतं आहे तर या बचतीचा सदुपयोग म्हणजेच आपण कम्प्युटर क्लास करायला पाहिजे. एसटी बसच्या पासमुळे वाचलेल्या खर्चात मी टायपिंग, MSCIT आणि आणखी काही सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग घेतले. पदवीचे शिक्षण आणि क्लासेसच्या बळावर मला पुढील शिक्षणासाठी IIMC म्हणजेच भारतीय जनसंचार संस्थान अमरावती (मराठी पत्रकारिता) विभागामध्ये प्रवेश मिळाला. 

माझ्या जीवनात एसटी बसचा मला खूप मोठा वाटा वाटतो, कारण सवलत पास नसती तर पदवीचे शिक्षण आवडत्या क्षेत्रात घेता आले नसते. त्याचबरोबर कम्प्युटर क्लासेससाठी मला आणखी वाट बघवी लागली असती. मी एसटी महामंडळाचा खूप आभारी आहे. प्रत्येकच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात लालपरी खूप महत्त्वाची ठरते.

75-yrs-logo-st-06-12.png