• 04 Oct, 2022 15:55

LIC Saral Pension Yojana: एकदाच प्रीमियम भरा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा!

LIC Saral Pension Yojana

LIC Saral Pension Yojana: एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजने अंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

प्रत्येकालाच आनंदी आणि सुखमय आयुष्य जगण्याची इच्छा असते आणि यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. तरूणवयात शक्य होईल तितके कष्ट घेऊन उतारवयात हातात पुरेशी रक्कम मिळेल यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुमच्यासाठी एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

आज आपण एलआयसीच्या अशा एका पॉलिसीबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या पॉलिसीमधून तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून पैसे मिळवू शकता. एलआयसीच्या त्या पॉलिसीचे नाव आहे; सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana). या योजनेमधून तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळवू शकता. चला तर या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ.

पॉलिसीचा प्रीमियम किती?

हा सिंगल प्रीमियम पेन्शन प्लॅन (Single Premium Pension Plan) आहे; तुम्हाला या पॉलिसीसाठी फक्त एकदाच प्रीमियम भरायचा असून त्याचा लाभ मात्र संपूर्ण जीवनभर मिळणार आहे. सरल पेन्शन योजना ही वार्षिक योजना असून तुम्ही ही पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला याचे लाभ लगेच लागू होतात. तसेच ही योजना घेतल्यानंतर तुमची पेन्शची रक्कम तेवढीच राहते.

पॉलिसी कोण घेऊ शकतं?

40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी खरेदी करू शकतात. पॉलिसीधारकाला या योजनेतून प्रत्येक महिन्याला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर पॉलिसीधारकाला एका महिन्यात किमान 1000 रुपये, 3 महिन्यांत 3000 आणि 6 महिन्यांत 6000 रुपये गुंतवावे लागतील.

सरल पेन्शन पॉलिसी ही दोन प्रकारे घेता येऊ शकते. त्याचे सिंगल लाईफ पॉलिसी आणि जॉईंट लाईफ पॉलिसी (Single Life Policy & Joint Life Policy) असे दोन भाग आहेत.

सिंगल लाईफ पॉलिसी (Single Life Policy)

सिंगल लाईफ पॉलिसी ही कोणत्याही एका व्यक्तीला घेता येते. पॉलिसीधारक हयात असताना त्याला त्याचा लाभ पेन्शनच्या स्वरूपात मिळतो आणि पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर, मूळ प्रीमियमची रक्कम पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला मिळते.

जॉईंट लाईफ पॉलिसी (Joint Life Policy)

जॉईंट लाईफ पॉलिसीच्या पर्यायानुसार नवरा-बायको हे दोघे या योजनेत सहभागी होऊ शकतात. या दोघांपैकी कोणालाही या पेन्शनची रक्कम मिळत राहते. जोडीदाराच्या मृत्यूनंतर जिवंत असलेल्या व्यक्तीला पेन्शनची पूर्ण रक्कम दिली जाते. योजनेनुसार, पेन्शनच्या रकमेत कोणतीही कपात केली जात नाही. तसेच जॉईंट लाईफ पॉलिसी घेतलेल्या पती-पत्नीच्या मृत्यूनंतर जो कोणी नॉमिनी असेल, त्यांना ती रक्कम दिली जाते.

LIC ही भारतातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी आहे. LIC इन्श्युरन्ससह गुंतवणूकदारांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी घेऊन आली आहे. या योजनेतून गुंतवणूकदारांना टॅक्स वाचवण्याचे पर्याय ही उपलब्ध होतात.