आयकर विभागाकडून आयकर विवरणपत्र सादर करण्याची प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करताना कर वजावटीचा लाभ घ्यायचा असल्यास करदात्याला संबधित कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आयकर सेक्शन 80 सी अंतर्गत विमा पॉलिसींसाठी प्रीमियम भरला असेल तर वर्षाला 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. मात्र त्यासाठी वर्षभरात भरलेल्या प्रीमियमची पावती किंवा स्टेटमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.
करदात्यांच्या सोयीसाठी एलआयसीसह सर्वच विमा कंपन्या ऑनलाईन प्रीमियम सर्टिफिकेट किंवा स्टेटमेंट्स उपलब्ध करतात. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. तिचा ग्राहकवर्ग देखील मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी एलआयसीकडून अनेक ऑनलाईन सुविधा दिल्या जातात. त्यापैकी एक प्रीमियम स्टेटमेंट वेबसाईटवरुन कसे डाऊनलोड करायचे हे जाणून घेऊया.
एलआयसीमधून तुम्ही विमा पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला त्याचे वार्षिक प्रीमियम स्टेटमेंट काढता येते. यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध आहे. जे ग्राहक प्रीमियम ऑनलाईन भरतात त्यांना थेट प्रीमियम पावती त्यांच्या ईमेलवर मिळते. याशिवाय सर्वसाधारण ग्राहकांसाठी देखील एलआयसीची पावती काढता येऊ शकते.
ऑनलाईन प्रीमियम स्टेटमेंटसाठी खालील स्टेप फॉलो करा.
- एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल. ज्यात युजरनेम आणि पासवर्ड तयार करा. यात व्हेरिफिकेशनसाठी काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्ही थेट एलआयसी ऑनलाईन अकाउंट या पेजवर जाल.
- एलआयसी ऑनलाईन अकाउंट पेजवर गेल्यानंतर तुम्ही डाव्याबाजुला प्रीमियम स्टेटमेंटचा पर्याय क्लिक करु शकता.
- Consolidated Premium Paid Statement वर क्लिक केल्यानंतर कोणत्या वर्षाची स्टेटमेंट काढायची आहे त्याचा तपशील सादर करा. यातही व्हेरिफिकेशनसाठी प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. उत्तर देऊन सबमिट केले तर तुमची प्रीमियम स्टेटमेंट दिसेल.
- प्रीमियम स्टेटमेंट कदाचित दुसऱ्या विंडोमध्ये सुरु होऊ शकते. तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर करता त्यावर अवलंबून आहे.
- प्रीमियम स्टेटमेंट डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढू शकता.