आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत असताना, एलआयसी (LIC)च्या आयपीओ (IPO) ने शेवटच्या दिवशी (9 मे) 2.91 टक्क्यांहून अधिकजणांनी नोंदणी केली. पण ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) पाहिला तर, इंडेक्समधील संकेत शेअर्सचा भाव कमकुवत झाल्याचे दाखवत आहे. बाजारातील निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत आणखी कमी झाली आहे. कंपनीचे स्टॉक लिस्टिंग 17 मे रोजी होणार आहे.
एलआयसीच्या आयपीओ (LIC IPO)ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2 मे रोजी एलआयसीने अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांची 71 टक्के हिस्सेदारी देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी विकत घेतली आहे. या आयपीओद्वारे 3.5 टक्के हिस्सा विकून 21 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे.
ग्रे मार्केटमध्ये काय आहे किंमत?
बाजारातील निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअरची किंमत आज म्हणजेच 9 मे रोजी 40 रुपयांपर्यंत खाली आली. तर 6 मे रोजी तो 50 रुपयांवर होता. आयपीओ वॉचवरही त्याची किंमत फक्त 40 रुपये आहे. इश्यूच्या पहिल्या दिवशी त्याची किंमत 105 रुपयांपर्यंत वाढली होती. मात्र, त्या दिवशी तो परत 65 रुपयांवर आला होता. इश्यू उघडण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचा प्रीमियम 85 रुपयांपर्यंत गेला होता. सध्या हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 40 रुपयांच्या प्रीमियमवर आहे. जर याची किंमत 40 रुपयेच राहिली तर एलआयसीचा स्टॉक 989 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो.
एलआयसी आयपीओबद्दल
एलआयसीचा मेगा आयपीओ 4 मे रोजी ओपन झाला असून आणि 9 मे रोजी बंद होणार आहे. एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. याच्या एका लॉटमध्ये 15 शेअर्स आहेत. एलआयसीच्या आयपीओचा आकार 21 हजार कोटी रुपये असून, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 5627 कोटी रुपये उभे केले आहेत.