भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) च्या आयपीओचा (IPO) प्रीमियम बुधवारी 11 मे, 2022 या दिवशी ग्रे मार्केटमध्ये (GMP) चांगलाच घसरला आहे. देशातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून याची गणना होत होती. याला देशभरातून गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद ही मिळाला. त्यामुळे याचे बाजारातील लिस्टिंग चांगले होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओचा प्रीमियम घसरल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंता पसरली आहे.
एलआयसीचा (LIC IPO) आयपीओ 17 मे रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. दरम्यान, मिडियामधील वृत्तांनुसार, ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओचा प्रीमियम 93-95 रुपये प्रति शेअरवर पोहोचला होता. त्यानंतर मात्र, तो खाली येऊ लागला. 5 मे रोजी तो 8 ते 10 रुपये प्रति शेअर यादरम्यान होता. त्यानंतर 6 आणि 10 मे रोजी त्यातील अस्थिरता खूपच वाढली. बुधवारी म्हणजे 11 मे रोजी तो 8 ते 9 रुपयांनी खाली आला आहे.
ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम घसरल्याचा काय परिणाम होतो?
ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा प्रीमियम नकारात्मक असणे म्हणजे, 17 मे रोजी जेव्हा एलआयसी आयपीओचं (LIC IPO) बाजारात लिस्टिंग होईल तेव्हा त्याची किंमत अंदाजित 941 रुपये (949 रूपये – 8 रूपये) असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रे मार्केटमधील प्रीमियमच्या दरावरून हेच सूचित होते की, याचा इश्यू प्रमाणित केलेल्या किमतीच्या खाली सूचीबद्ध होऊ शकतो.
12 मे रोजी शेअर्सचे वाटप
एलआयसीच्या आयपीओसाठी बोली लावलेल्या गुंतवणुकदारांना 12 मे रोजी शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. ज्यांना बोली लावूनही शेअर्स मिळाले नाहीत, अशा गुंतवणुकदारांचे पैसे बॅंक खात्यात जमा होतील.
परदेशी गुंतवणूकदारांच्या थंड प्रतिसादामुळे ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओचा प्रीमियम कमी झाला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशांतर्गत संस्थात्मक खरेदीदारांनी आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवली होती. पण विदेशी गुंतवणूकदारांनी यात मात्र फार उत्साह दाखवला नव्हता.