भारतीय शेअर बाजारात नुकतीच झालेली मोठी घसरण सर्वांनीच पाहिली असेल. मागील जवळपास दोन आठवडे सातत्याने तेजीच्या दिशेने बाजाराचे मार्ग्रकमण सुरू असताना अचानकपणे त्याला ब्रेक लागला आणि बहुतांश समभागांत मोठी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (National Stock Exchange-NSE) निर्देशांक असणार्या निफ्टी (NIFTY)मध्येही अवघ्या दोन दिवसांत जवळपास 400 अंकांची घसरण दिसून आली.
शेअर बाजारात चढउतार हे नवे नाहीत. मात्र एकाएकी झालेल्या तीव्र घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांना खूप मोठा फटका बसतो. ज्यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून शेअर्सची खरेदी केलेली असते त्यांना याचा फटका बसत नाही. पण अल्पकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांना किंवा इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading) करणार्यांना, ऑप्शन (Option) फ्युचर्स (Futures)मध्ये ट्रेडिंग करणार्यांना अशा तीव्र घसरणीमुळे मोठे नुकसान सोसावे लागते.
काय आहेत स्टॉप लॉसची वैशिष्ट्ये
घसरणीच्या शक्यता गृहित धरुन त्यामुळे होणारे नुकसान नियंत्रणात राहण्यासाठी शेअर बाजारात ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस हे टूल किंवा संकल्पना वापरली जाते.
रस्त्यावरुन दुचाकी चालवताना ज्याप्रमाणे हेल्मेट घातलेले असल्यास अपघातप्रसंगी आपले डोके शाबूत राहते, त्याचप्रमाणे बाजारात ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस ठेवल्यास आपले होणारे नुकसान सीमित राखता येते.
या संकल्पनेच्या नावातून त्याची रचना कशी असेल हे लक्षात येते. स्टॉप लॉस म्हणजे ट्रेडिंग करताना आपल्याला किती प्रमाणापर्यंत नुकसान झालेले परवडू शकते ती सीमारेषा. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या कंपनीचे 220 रुपयांचे 100 शेअर्स इंट्राडेमध्ये खरेदी केले असतील आणि अचानकपणाने त्या शेअर्सचा भाव घसरू लागला तर मॅन्युअली आपल्याला कोणत्याही पातळीवरुन ते सेल करुन बाहेर पडण्याचा मार्ग असतोच; परंतु बरेचदा घसरणीचा जोर इतका प्रचंड असतो की आपल्याला संधी मिळेपर्यंत भाव खूप खाली गेलेला असतो. अशा वेळी जर आपण 210 रुपयांचा स्टॉप लॉस सेट करुन ठेवला असेल तर त्या शेअर्सचा भाव या पातळीवर आल्याबरोबर तुमचे शेअर्स आपोआप विकले जातात. मग त्यानंतर त्यामध्ये कितीही घसरण झाली अथवा तिथून ते पुन्हा वधारले तरी तुमचा व्यवहार संपुष्टात आलेला असतो.
विशेषतः निफ्टी किंवा बँक निफ्टीच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर स्टॉप लॉसचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही.
अगदी ताजे उदाहरण पाहायचे झाल्यास मंगळवारी 18 जानेवारी 2022 रोजी साधारणतः दुपारी 2.45 नंतर शेअर बाजारात एकाएकी मोठी घसरण सुरू झाली आणि पाहता पाहता निफ्टीचा निर्देशांक 200 अंकांनी घसरला. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने जर स्टॉप लॉस लावलेला नसेल तर त्याला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. याऐवजी स्टॉप लॉस सेट केला असेल तर घसरण कितीही मोठी झाली तरी आपण त्यापूर्वीच निसटून गेलेलो असतो.
स्टॉप लॉस किती असावा याला ठोस असे निकष अथवा नियम नाहीत. प्रत्येक ट्रेडर्स आपापल्या जोखीम क्षमतेनुसार त्याची पातळी ठरवत असतो.
स्टॉप लॉस ट्रिगर लावल्यानंतर भाव 10 पैकी 1 किंवा 2 वेळा सुधारण्याची शक्यता असते; पण 8 वेळा असा भाव घटत जात असतो.
स्टॉप लॉसचा वापर केवळ होणारे नुकसान मर्यादित राखण्यासाठीच होतो असे नाही, तर फायद्यासाठीही होतो. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या शेअर्सचा भाव 220 रुपयांवरून 230 रुपयांवर गेला आणि तिथेच तो रेंगाळत राहिला किंवा एक-दोन अंकांनी खाली-वर होत राहिल्यास आपण तात्काळ 228 रुपयांचा स्टॉप लॉस सेट करुन ठेवू शकतो. यामुळे सदर शेअरचा भाव जरी पुन्हा 220 रुपयांवर आला तरी 228 रुपयांच्या पातळीवर असताना आपला स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला प्रति शेअर 8 रुपये नफा मिळवून देऊन व्यवहार संपुष्टात आलेला असतो.
थोडक्यात, कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्कचा वापर केला जातोय, अगदी तीच भूमिका स्टॉप लॉसचे टूल शेअर बाजारात ट्रेडिंग करताना पार पाडते. सामान्यतः आपण खरेदी केलेल्या भावापेक्षा 10 ते 20 टक्के वजा करुन स्टॉप लॉसची पातळी ठेवली जाते.