गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण अहमदाबाद येथील सेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयातून घेतले. त्यानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या वर्षातच शिक्षण सोडावे लागले होते. गौतम यांच्या वडिलांचे नाव शांतीलाल आणि आईचे नाव शांता बेन होते. त्याचे वडील कपड्यांचा छोटासा व्यवसाय करायचे. असे गौतम सुरुवातीच्या कालावधीत आई-वडील आणि भावांसोबत एका छोट्या चाळीत राहत होते, अशी नोंद आहे. पूर्वी शांतीलाल हे उत्तर गुजरातमधील थरड शहरात राहत होते. कुटुंब मोठे झाल्यावर ते कुटुंबासह स्थलांतरित झाले.
गौतम यांना सात भावंडे आहेत. मनसुखभाई अदानी असे मोठ्या भावाचे नाव आहे. इतर बंधूंमध्ये विनोद अदानी, राजेश शांतीलाल अदानी, महासुख अदानी आणि वसंत एस अदानी यांचा समावेश आहे. बहिणीबद्दल फारशी माहिती अजून फारशी पुढे आलेली नाही.
तरुण वयातच आले मुंबईत
गौतम यांना त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात रस नव्हता म्हणून मग शिक्षण सोडले आणि वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत आले. येथे त्यांनी हिरे व्यापारी महिंद्रा ब्रदर्समध्ये दोन वर्षे काम केले. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी मुंबईत स्वतःचा हिरा दलालीचा व्यवसाय सुरू केला आणि पहिल्याच वर्षीच लाखोंची कमाई केली. गौतमचा मोठा भाऊ मनसुखभाई अदानी यांनी 1981 मध्ये अहमदाबादमध्ये प्लास्टिक कंपनी विकत घेतली. गौतम यांनाही बोलावले होते. अदानी यांनी पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) आयात करून जागतिक व्यवसायात प्रवेश केला.
व्यवसायाचा पुरेसा अनुभव मिळवल्यानंतर त्यांनी 1998 मध्ये अदानी एक्सपोर्ट्स लिमिटेडची स्थापना केली. ही कंपनी पॉवर आणि अॅग्रिकल्चर कमोडिटीज क्षेत्रात काम करते. 1991 पर्यंत या कंपनीने आपले पाय रोवले आणि प्रचंड नफा कमावण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात गौतम अदानी स्कूटरवरून फिरत असत. यानंतर मारुती-800 ने प्रवास सुरू केला. आता आलिशान वाहनांनी प्रवास करतात हे सांगायला नकोच! आतातर त्यांच्याकडे अनेक हेलिकॉप्टर आणि खाजगी चार्टर्ड विमानेदेखील आहेत.
पत्नी सांभाळतात अदानी फाऊंडेशन
पत्नी प्रीती अदानी या व्यवसायाने दंतचिकित्सक असून त्या अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षाही आहेत. गौतम आणि प्रीती अदानी यांना दोन मुलगे आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि लहान मुलाचे नाव जीत अदानी आहे.करण अदानी यांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. अदानी पोर्ट्सचे सीईओ म्हणून ते कंपनीत कार्यरत आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. करणप्रमाणेच त्याचा धाकटा भाऊ जीत अदानी यानेही परदेशात शिक्षण घेतले आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, जीत 2019 मध्ये भारतात परतला आणि कंपनीच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. सागर अदानी हे देखील अदानी ग्रुपमध्ये सक्रिय आहेत. गौतमचा भाऊ राजेश यांचा तो मुलगा आहे.
स्कूटर, मारुती 800 ते खाजगी चार्टर्ड विमाने असा Gautam Adani यांचा हा प्रवास आहे, Hindenburg अहवालानंतर त्याला आता नुसता ब्रेक लागलाय असे नव्हे तर तो प्रवास उलट्या दिशेनेही होताना दिसतोय.