अमेरिकेत आयटी क्षेत्रात झालेल्या कर्मचारी कपातीत 30% ते 40% भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.येत्या काळात त्यांना नवीन नोकऱ्या मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. नोकरीवरून काढून टाकलेल्यांमध्ये H-1B आणि L1 व्हिसाधारक भारतीयांची संख्या अधिक आहे.
गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि एमेझॉनसह अनेक IT कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. ज्यात सर्वाधिक कर्मचारी भारतीय आहेत. द वॉशिंग्टन पोस्टनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून गुगल, मायक्रोसॉफ्टसह इतर छोट्यामोठ्या कंपन्यांकडून सुमारे 2 लाख लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कामावरून काढून टाकल्यानंतर यूएसमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना नवी नोकरी शोधावी लागणार आहे. यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे.याचे मुख्य कारण म्हणजे H-1B व्हिसा धारकांना कामावरून कमी केल्यास 60 दिवसांच्या आत नवी नोकरी शोधावी लागते. जर 60 दिवसात H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली नाही तर त्यांना अमेरिकेतून बाहेर पडावे लागते.
H-1B आणि L1 व्हिसाधारक कर्मचारी मोठ्या संख्येने
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत 30% ते 40% पेक्षा जास्त भारतीय आयटी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यात H-1B आणि L1 व्हिसाधारक मोठ्या संख्येने आहेत. वास्तविक H-1B व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा (Non Immigrant Visa) आहे, जो अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची मुभा देतो. H-1B व्हिसा मिळाल्यानंतरच भारत, चीनसह अनेक देशांतील हजारो लोकांना IT कंपन्या नोकरी देतात.
आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक IT कंपन्यांनी नोकरभरती बंद ठेवली आहे. त्यामुळे 60 दिवसांमध्ये नवीन नोकरी मिळणे कठीण असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. बेरोजगारीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत याबद्दल कर्मचारी चिंतीत असल्याचे सांगितले जात आहे.
H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांचा विचार व्हायला हवा
सिलिकॉन व्हॅलीत काम करणारे1 उद्योजक अजय जैन भुटोरिया माध्यमांशी बोलताना म्हणाले, "हजारो तंत्रज्ञान कंपन्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, परंतु ज्यांच्याकडे H-1B व्हिसा आहे अशा कर्मचाऱ्यांपुढे अतिरिक्त आव्हाने उभी आहेत. त्यांना 60 दिवसांच्या आत नवीन नोकरी शोधणे आवश्यक आहे, नोकरी न मिळाल्यास त्यांना देश सोडावा लागणार आहे. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना थोडी सवलत आणखी मिळायला हवी, जेणेकरून ते नवी नोकरी शोधू शकतील"
आर्थिक मंदीचे सावट गडद
गेल्या काही दिवसांपासून IT क्षेत्रातली महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कंपन्यांनी वाढत्या आर्थिक खर्चाचे कारण देत कर्मचारी कपात केली आहे. आयटी कंपन्यांनंतर ऑटो इंडस्ट्री मध्येसुद्धा कामगार कपात केली जात आहे. करोना संसर्गानंतर आवश्यक तो आर्थिक फायदा झाला नसल्याचे कारण बहुतांश कंपन्यांनी दिले आहे. येणाऱ्या काळात भारतात आणि भारताबाहेर काम करणाऱ्या भारतीयांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.