Navi Mumbai: नवी मुंबईतील अनधिकृत व्यावसायिकांनी ठिकठिकाणी जमिनीवर कब्जा केल्याचे समोर आले आहे. सिडको(CIDCO) आणि एमआयडीसीच्या(MIDC) कोट्यवधी रुपये किमतीच्या मोकळ्या भूखंडावर, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणाऱ्या जागांवर शहरातील वाहतुकीच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी हा कब्जा केल्याचे दिसून येत आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने व्यावसायिकांचा कब्जा
सिडको(CIDCO) आणि एमआयडीसीच्या(MIDC) कोट्यवधी रुपये किमतीच्या मोकळ्या भूखंडावर, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणाऱ्या जागांवर आणि शहरातील वाहतुकीच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी नर्सरींचा(रोपवाटिका) बेकायदा व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने हे व्यवसाय सुरु केले जात असल्याने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यास प्रशासकीय यंत्रणाही धजावत असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या ठिकाणी केलाय कब्जा?
नवी मुंबईमधील नेरूळ, बेलापूर आर्टिस्ट व्हिलेज, सारसोळे गाव, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, कोपरी, ऐरोली, पटनी रस्ता पामबीच रस्ता अशा वाहतुकीच्या मार्गावर तसेच औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोकळ्या भूखंडावर बेकायदा नर्सरींचे पेव फुटले असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार हा वाशी ब्लू डायमंड(Vashi Blue Diamond Circle) सर्कलसमोरील भगत ताराचंद हॉटेल आणि खैरणे-कोपरी पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या भूखंडांवर पाहायला मिळत आहे. याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. जी. राठोड(R.G.Rathod) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिक्रमण केलेल्या नर्सरी हटवण्यात येतील असे सांगितले असून सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रांतबे(Priya Rantabe) यांनी देखील सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
बेकायदेशीर विद्युतपुरवठा
नवी मुंबई मधील अनेक ठिकाणी अशा नर्सरींना बेकायदा विद्युतपुरवठाही करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या सुनियोजित शहरात गोदामांसाठी चौ. फूट दराने मासिक भुईभाडे आकारले जाते त्याठिकाणी बेकायदा नर्सरी थाटण्यासाठी सिडको(CIDCO), एमआयडीसी(MIDC) किंवा पालिकेकडून कोणताही कर आकारला जात नसल्याने बेकायदा नर्सरींचे प्रमाण वाढले आहे असे अनेकांचे म्हणणे आहे.