Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC@75Years : छोट्या व्यवसायिकांचा भक्कम आधार बनून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात महत्त्वाचे योगदान देतेय 'लालपरी'

ST Bus

MSRTC@75Years : 1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 75 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच हे वर्ष एसटीचं अमृतमहोत्सव वर्ष आहे. ग्रामीण भागातील लोकांना एसटी कशी उपयुक्त आहे? एसटी शिवाय ग्रामीण जीवन कसे असू शकते? हे जाणून घेऊया, ग्रामीण भागातील लोकांशी महामनीने केलेल्या चर्चेतून…

MSRTC@75Years : 1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 75 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच हे वर्ष एसटीचं अमृतमहोत्सव वर्ष आहे. तेव्हापासून ते आतापर्यन्त ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्वाची आणि उपयुक्त प्रवास सुविधा म्हणजेच एसटी. ग्रामीण भागातील लोकांना एसटी कशी उपयुक्त आहे? एसटी (ST Bus) शिवाय ग्रामीण जीवन कसे असू शकते? हे जाणून घेऊया, ग्रामीण भागातील लोकांशी ‘महामनी’ने केलेल्या चर्चेतून…

ग्रामीण भाग म्हटलं की लोकसंख्या कमी, लोकसंख्या कमी तर गावात उद्योगधंदे कमी, सुखसोई कमीच असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर शहरात कोणत्याही कामासाठी जावे लागते. ज्यांच्याकडे स्वतःची वाहने आहेत ते त्याने प्रवास करतात पण, ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत आशा लोकांना खासगी वाहन सेवा किंवा मग एसटीबसची वाट बघावी लागते. खासगी वाहनांकडून अनेकदा जास्त तिकीटसुद्धा घेतली जाते. आधीच घरची परिस्थिती नाजुक आणि त्यात ही खासगी वाहनांकडून होणारी फसवणूक ही सामान्य माणसाला परवडणारे नाही.

खासगी वाहनांचे तिकीट दर

पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यात म्हणून तिकीटचे दरसुद्धा (Ticket price) आम्ही वाढवले असे अनेकदा खासगी वाहन (Private Vehicles) चालकांकडून ऐकायला मिळते. मग या सर्व फसवणुकीतून स्वतःला वाचवण्यासाठी सामान्य माणसांकडे कोणता पर्याय आहे, तर तो म्हणजे 'लालपरी' म्हणजेच एसटीमहामंडळाची बस. खासगी वाहनांची तिकीट सध्या एसटीबसपेक्षा 10 रुपयांनी जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, छोटा कामगार वर्ग, छोटे व्यावसायिक हे सर्व जण दररोज बसने प्रवास करतात.

st-2.jpg
उन्हातान्हात बसची वाट बघत असलेले प्रवासी 

छोटे व्यावसायिक म्हणजेच दूध, दही, ताक विकणारे, सायकल दुरुस्ती करणारे, त्याचबरोबर झाडू, चादर, चप्पल यासारखे अनेक पदार्थ, वस्तू विक्रेता. यांच्याकडे दूध भरून असलेल्या कॅन, झाडूची जुडी आणि इतर वस्तूं असतात, त्या सर्व विक्रीच्या वस्तु खांद्यावर घेऊन हे लोकं एसटी बसने प्रवास करतात. आजूबाजूच्या गावात हे आपला व्यवसाय चालवतात. सकाळी 7 वाजल्यापासून यांचा हा व्यवसाय सुरू होतो. उदा. व्यवसाय करणारा जर गाडेगाव येथील असेल आणि त्यांना राजुरा बाजार येथे जायचे आहे. या दोन गावातील अंतर 10KM असेल, तर गाडेगाव वरून निघणारी पहिली बस 7 वाजता त्यांना पकडावी लागते. ती बस गेल्यानंतर 1 तास बसची वाट बघावी लागते.

एसटी बसेसच्या टाइमवर आमचे डेली इन्कम अवलंबून असते

बसेसच्या वेळेवर छोट्या व्यावसायिकांचे दररोजचे इन्कम अवलंबून असते. त्यांची जर बस सुटली तर गावातील महिला तोपर्यंत शेतात जातात आणि व्यावसायिकांना तसंच खाली हात परत यावं लागतं आणि खासगी वाहनाने प्रवास केला तर मिळणारा नफा पूर्ण प्रवासात जातो.

उदा. अमरावती जिल्ह्यातील राजुरा बाजार येथील एक म्हातारी आजी. ती झाडू विकण्याचा व्यवसाय करते, राजुरा बाजारच्या आजूबाजूची सर्व गावं ती एसटी बसने प्रवास करून फिरते. ‘महामनी’ने तिच्याशी चर्चा केली असता तिने सांगितले की, मी गेल्या 10 वर्षापासून हा व्यवसाय करत आहे. आता पर्यंतचा पूर्ण प्रवास मी एसटीबसने केला. दररोज एक एक गाव फिरण्यासाठी ठरवले आहे. सोमवार ते रविवार या आठवड्याच्या सातही दिवस मी प्रत्येक गावाला जाऊन आपला व्यवसाय चालवते. माझ्या व्यवसाय हा पूर्ण ग्रामीण भागातील महिलांवर अवलंबून आहे.

st-5.jpg
सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणारा एक छोटा व्यावसायिक. बाहेर गावातून शहराच्या ठिकाणी बसनेच प्रवास करून आपला व्यवसाय चालवतो. 

सकाळी 9 ला महिला वर्ग शेतात जातो, त्यामुळे मला कोणत्याही गावात सकाळी 7.30 पर्यंत पोहचावे लागते. एखाद्या वेळी जर बस सुटली तर माझ्या धंदा कमी होतो कधी कधी तर जशी जाते तसंच घरी परत यावं लागते. बसच्या टाइमनुसार काम केल्यास माझे दिवसाचे इन्कम बऱ्यापैकी होते. तिकडून परत येण्याचा पण टाइम ठरलेला आहे, कारण तिकडून आल्यानंतर मला शेतात झाडू बनवण्यासाठी सामग्री आणायला जावे लागते.

गेल्या 10 वर्षापासून मी एसटी बसने प्रवास करून माझा व्यवसाय चालवत आहे. आता तर 50 टक्के सवलत असल्याने आधीपेक्षाही कमी तिकीट जात आहे. बसची सेवा जर उपलब्ध नसती तर मला होणार नफा कमी असता आणि मी बाहेर गावी जाऊ शकले नसते. खासगी वाहने फक्त पैसे जास्त घेतात असे नाही तर वाहने सुद्धा लवकर सोडत नाही. पूर्ण प्रवासी मिळाल्यानंतरच वाहन सोडले जाते. अशा परिस्थितीमध्ये एसटी बस खूप महत्वाची ठरते.

विद्यार्थ्यांना 20 दिवस मोफत प्रवास

ग्रामीण भागात (Rural Areas) जास्तीत जास्त 12 वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध असते. समोरील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागते. बाहेर गावी म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी. गावावरून जर शैक्षणिक स्थळाचे अंतर 50 किलोमीटरच्या आत असेल तर अनेक विद्यार्थी तेथून ये-जा करतात. तेव्हा त्यांना बसेसचा आधार घ्यावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना पास दिली जाते.

st-6.jpg
विद्यार्थी मासिक सवलत पास 

'वरुड डेपो मॅनेजर' यांच्याशी ‘महामनी’ने संवाद साधला तेव्हा ते सांगतात की, शालेय मुलांना पास दिली जाते त्यात त्यांच्याकडून फक्त 10 दिवसाचा प्रवास खर्च घेतला जातो. उदा. वरुड येथून वाडेगाव या गावाची तिकीट 20 रुपये असते म्हणजेच दररोज ये - जा करणे 40 रुपये खर्च येतो. म्हणजेच तिकीट दरानुसार 1 महिन्याचे पैसे 1200 रुपये होतात. पण, पासमुळे त्याचा दर 380 रुपये घेतला जातो. म्हणजेच 20 दिवस त्यांना मोफर प्रवास दिला जातो.

वाट पाहीन पण एसटीनेच जाईन!

ग्रामीण भागातील अनेक लोकं मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे इन्कम आणि खर्चाचे बजेट दर आठवड्याप्रमाणे ठरलेले असतात. अशातच जर त्यांना एखाद्या वेळी अर्जंट तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे काम असेल तर नक्कीच त्यांचे बजेट बिघडेल. पण आता, महिलांना 50 टक्के सूट असल्याने त्या प्रवास करतील कारण त्यांना लागणारी तिकीट आता 50 टक्केच लागणार. दुसरे म्हणजे खासगी वाहनाने प्रवास केल्यास त्यांचे एक्स्ट्रा पैसे जातील. म्हणून सामान्य लोकं जास्तीत जास्त बसनेच प्रवास करतात. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन! असे धोरण ठेवून सध्या सामान्य माणूस एसटीनेच प्रवास करत आहे. 

फिरस्ती करणाऱ्या लोकांसाठी लालपरी कशी महत्त्वाची ठरते

अनेक लोकं सिजनेबल व्यवसाय करतात. त्या व्यवसायात त्यांचे पूर्ण कुटुंब मदत करते. मुख्यतः राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशातील लोकं असे व्यवसाय करतात. उन्हाळ्यामध्ये तांबे पितळीच्या मूर्ती बनवणे, मातीच्या मूर्ती बनवणे, हिवाळ्यामध्ये ब्लँकेट, बेडशिटची विक्री, पावसाळ्यामध्ये रेनकोट, छत्रीची विक्री अशा प्रकारचे व्यवसाय हे लोकं करतात. 

st-3.jpg
इतर राज्यातून कमाई करण्यासाठी आलेल्या व्यवसायिकांची राहण्याची व्यवस्था 

महाराष्ट्रातील एखाद्या गावात ते त्यांचे पाल बांधतात आणि तिथे काही दिवस राहण्याची व्यवस्था करतात. त्या गावाशेजारील काही गावात ते आपल्या वस्तु विकण्यासाठी जातात तेव्हा त्यांना एसटी बसनेच प्रवास करावा लागतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते इतक्या दूर आल्यानंतर त्यांचा नफा शिल्लक राहावा म्हणून ते लोकसुद्धा एसटीबसचा पर्याय निवडतात. 

75-yrs-logo-st-06-2.png