गुंतवणुकीतूनच संपत्ती वाढत जाते, असे म्हटले जाते. मात्र, तुम्ही कशात गुंतवणूक करताय यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. विचारपूर्वक व अभ्यास करूनच कोणत्याही गोष्टीत पैसे गुंतवणूक कधीही चांगले असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये विविधता असणे गरजेचे आहे.
पोर्टफोलिओमधील विविधताच तुमची संपत्ती वाढवण्यास व जोखीम कमी करण्यास मदत करते. तुम्ही देखील नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर पोर्टफोलियोमध्ये विविधता असणे का गरजेचे आहे, हे जाणून घ्यायला हवे.
या लेखामधून पोर्टफोलियोमध्ये विविधता का गरजेची आहे व विविधता आणण्यासाठी नक्की कशात गुंतवणूक करावी, हे समजून घेऊयात.
Table of contents [Show]
पोर्टफोलियोमध्ये विविधता असावी म्हणजे नक्की काय?
कोणताही अनुभवी गुंतवणूकदार तुम्हाला नेहमीच सल्ला देईल की, संपूर्ण गुंतवणूक एकाच गोष्टीत करू नये. थोडक्यात, तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये विविधता ( Portfolio Diversification ) एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करण्याऐवजी वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवणूक करावी.
समजा, तुम्ही केवळ स्टॉक्समध्येच गुंतवणूक करत आहात. तर असे न करता स्टॉक्ससह म्युच्युअल फंड, सोने, जमीन, बाँड्स, एफडीमध्ये गुंतवणूक करायला हवी. स्टॉक्समध्येही गुंतवणूक करताना लार्ज व स्मॅल कॅप कंपन्यांची निवड करावी, जेणेकरून यातही विविधता येईल.
गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता का गरजेची?
जोखीम कमी – तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे जोखीम कमी करणे. भविष्यात बाजारात तेजी येईल की मंदी, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे एकाच स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी करावे. याशिवाय, बाजारात मंदी असली तरीही तुमचे नुकसान होणार नाही अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी.
परताव्यात सातत्यात – कधीही दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करावी. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता असल्यास नुकसान कमी होते व परताव्यामध्ये देखील सातत्य असते. समजा, स्टॉक्समध्ये केलेल्या गुंतवणुकीत नुकसान झाले असेल. अशावेळी बाँड्समधील गुंतवणूक तुम्हाला नफा मिळवून देते. विविधतेमुळे एका गुंतवणुकीत झालेले नुकसान दुसऱ्या गोष्टीतून भरून येते.
विविधता आणण्यासाठी यात करा गुंतवणूक
स्टॉक्स व बाँड्स | तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी स्टॉक्स व बाँड्सची निवड करू शकता. मात्र, यात गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. कारण, स्टॉक्स व बाँड्स हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. स्टॉक्समध्ये परतावा जास्त असण्यासोबतच जोखीमही जास्त असते. तर दुसरीकडे बाँड्समध्ये अस्थिरता फार कमी असते. मात्र, यातून मिळणारा परतावा देखील जास्त नसतो. |
म्युच्युअल फंड व ईटीएफ | पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी म्युच्युअल फंड व ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे. मात्र, म्युच्युअल फंड व ईटीएफच्या माध्यमातून कशात गुंतवणूक केली जातेय, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व म्युच्युअल फंडच्या माध्यमातून समान स्टॉक्स व बाँड्समध्येच गुंतवणूक केली असल्यास त्याचा फायदा होणार नाही. |
सोने | भारतीयांना सोन्यात गुंतवणूक करण्याची प्रचंड आवड असते. मात्र, प्रामुख्याने सोन्याचे दागिने खरेदी केली जातात. मात्र, तुम्ही सोन्याचे इतर प्रकार जसे की डिजिटल सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. |
मालमत्तेत करा गुंतवणूक | तुम्ही जर गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल व स्टॉक्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जोखीम स्विकारायची नसल्यास मालमत्ता खरेदी करणे कधीही चांगले. तुम्ही घर अथवा जमीन खरेदी करू शकता. याशिवाय, बँकेत मुदत ठेव खाते उघडून त्यात पैसे जमा करू शकता. मात्र, यातून मिळणारा परतावा कमी असतो. |
पोर्टफोलिओ विविधतेचे तोटे
लक्षात घ्या की, पोर्टफोलिओमध्ये विविधता असल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मात्र, याचे काही तोटे देखील आहे. विविध गोष्टीत एकाचवेळी गुंतवणूक केल्यास प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नाही. गुंतवणुकीची माहिती ठेवण्यात देखील समस्या येते. याशिवाय, पोर्टफोलिओमधील विविधतेमुळे जोखीम काही प्रमाणात कमी होत असले तरीही थोडेही नुकसान होणारच नाही याची हमी मिळत नाही.