मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पालकांवर असते. मुलांच्या जन्मापासूनच ही जबाबदारी सुरू होते. त्यामुळे त्यांचा आरोग्य विमा काढणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांचा आरोग्य विमा अथवा जीवन विमा काढून पालक स्वतःची जबाबदारी पार पाडू शकतात.
या लेखातून मुलांचा आरोग्य विमा काढण्याचे काय फायदे आहेत व विमा काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मुलांचा आरोग्य विमा काढणे का गरजेचे?
मुलांच्या जन्मपासूनच त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अनेकांना वाटते की मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने ते कमी आजारी पडतात. मात्र, हा समज चुकीचा आहे. अनेकदा पाहायला मिळते की हवामान बदलानुसार मुलं वारंवार आजारी पडतात.
लहान मुलांना सर्दी-खोकला, दातांशी संबंधित समस्या, खेळताना दुखापत होणे या सामान्य गोष्टी आहेत. पण वेळेवर उपचार न घेतल्यास लहानसा आजार पुढे धोकादायक ठरू शकतो. मुलांचा वैद्यकीय खर्चही जास्त असतो. त्यामुळे आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे.
मुलांचा आरोग्य विमा काढण्याचे फायदे
वैद्यकीय सुविधा | वाढत्या वयानुसार मुलांना डॉक्टरच्या तपासणीची गरज असते. लसीकरण, औषधे व आरोग्य सेवांची गरज असते. आपले मुलं तंदुरुस्त व निरोगी राहिल याची जबाबदारी पालकांची असते. मात्र, आर्थिक स्थितीमुळे अनेकदा मुलांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देता येत नाही. अशावेळी आरोग्य विमा असल्यास चांगल्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सुविधांचा लाभ मिळतो. नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी, लसीकरण करता येते. |
आर्थिक सुरक्षा | आरोग्य विमा काढण्याचा मूळ उद्देश हा वैद्यकीय खर्च वाचवणे हा असतो. हॉस्पिटलचे बिल भरमसाठ आल्यावर याचा भार खिश्यावर पडतो. मात्र, आरोग्य विमा काढलेला असल्यास चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी पैशांचा विचार करण्याची गरज पडत नाही. विमा नसल्यास गंभीर आजार व दुखपतीच्या स्थितीमध्ये हॉस्पिटलचे प्रचंड बिल भरावे लागू शकते. |
गुंतवणूक व विमा | विमा काढल्याने मोफत आरोग्य सुविधांचा लाभ तर मिळतोच, सोबतच हा गुंतवणुकीचाही चांगला मार्ग आहे. नियमित भरलेले विम्याचे हफ्ते ही एकप्रकारे गुंतवणूकच असते. विम्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर या पैशांचा वापर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी करता येतो. |
मुलांचा आरोग्य विमा काढताना या गोष्टी ठेवा लक्षात
मुलांचा आरोग्य विमा काढताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास नक्कीच फायदा होईल. विमा काढताना सर्वात प्रथम योग्य प्लॅनची निवड करणे गरजेचे आहे. विमा प्लॅनचा प्रीमियम व त्यात मिळणाऱ्या सुविधा पाहा. तसेच, या प्लॅनमध्ये कोणत्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल, कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता, या सर्व गोष्टींची माहिती घ्या.
मुलांसाठी सर्वसमावेश कव्हरेज असेल अशा विम्याची निवड करावी. कमीत वय असतानाचा मुलांचा विमा काढणे देखील गरजेचे आहे. याशिवाय, आधीपासूनच कौटुंबिक आरोग्य विमा असल्यास मुलांचा त्यात समावेश करू शकता. यामुळे पैशांची बचतही होईल.