Rajura Bazar Chilli Market: दरवर्षी मिरची पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांना समाधान देते. पण, या वर्षी मिरची पिकाला निसर्गाने साथ दिली नाही त्यामुळे अनेकांना आपली मिरची उपटून फेकावी लागली. विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी मिरची उपटून फेकली. काहींना भरघोस नफा सुद्धा मिळाला. विदर्भातील सर्वात मोठे मिरची मार्केट राजुरा बाजार येथे आहे. शेतकरी मिरची थेट राजुरा मार्केटला घेऊन जातात.
विदर्भातील कानाकोऱ्यातील मिरची पीक घेणारे शेतकरी राजुरा बाजार येथे मिरची विक्रीसाठी आणतात. राजुरा बाजार येथील मार्केट मध्ये सीजन सुरू असतांना दररोज 300 टनांहून अधिक मिरचीची खरेदी-विक्री होत असते. राजुरा बाजार येथील मार्केटचे वैशिष्टे म्हणजे हे मार्केट रात्रभर सुरू असते.
मिरची मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल
राजुरा बाजार मार्केट मधील मिरच्या संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पसंत केल्या जातात. दरवर्षी हा बाजार सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो. या मार्केटमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. राजुरा बाजार कृषी उत्पन्न बाजाराचे वार्षिक आर्थिक व्यवहारही याच बाजारपेठेवर अवलंबून असतात. अमरावती जिल्ह्यातील वरुड, शेंदूरजनाघाट, चांदूरबाजार, मोर्शी आदी भागातील शेकडो शेतकरी आपला ताज्या हिरव्या मिरचीचा माल घेऊन या मार्केटमध्ये येतात.
रात्रभर चालते मिरचीची खरेदी-विक्री
हिरव्या मिरचीचा हंगाम सप्टेंबर ते मार्चपर्यंत असतो. या भागात मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजाराच्या आधारे जे आपला माल विकतात. देशातील इतर सर्व बाजारपेठा सकाळपासून सुरु होतात. पण राजुरा मार्केट हा एकमेव बाजार आहे जो संध्याकाळी 5 वाजता सुरु होतो आणि रात्रभर मिरचीची खरेदी विक्री झाल्यावर पहाटे 4 वाजता बंद होतो. खरेदी-विक्रीसोबतच येथे लोडिंगचे कामही मोठ्या प्रमाणावर केले जाते.
अनेकांना मिळतोय रोजगार
राजुरा बाजारपेठेतील हिरव्या मिरचीला महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह दिल्ली, कोलकाता, गोरखपूर, गोंदिया, भोपाळ, मुंबई, रायपूर, फिरोजपूर, आंध्र प्रदेशातील मुख्य बाजारपेठांमध्ये मागणी आहे. या मार्केटच्या मदतीने शेतकरी, व्यापारी, विक्रेतेच नव्हे तर चहा, फराळ, पान टपरीवर, वाहनचालक, हमाल यांनाही रोजगार मिळत आहे. मार्केट जवळील सुहाणा हॉटेलचे मालक प्रमोद ताटे सांगतात, मार्केट सुरू असताना आमचे हॉटेलसुद्धा खूप चांगले चालते. दिवसाला 5 हजार रुपयांपर्यंत कमाई होते. नेहमी दिवसाला 1000 रुपये पर्यंत कमाई आम्ही करतो. त्यामुळे येथील मिरची मार्केट आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, रात्रभर जागरण करून येथील सर्वच लोक आपापले बिझनेस चालवतात.