रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला प्रत्येकाकडून दिला जातो. यामागचे कारण म्हणजे मालमत्तेत केलेली गुंतवणूक ही भविष्यातील आधार ठरू शकते. इतर कोणतीही बचत केलेली नसली तरीही निवृत्तीनंतर तुमचे घरच तुमचा आधार बनू शकते. याच घराच्या मदतीने तुम्ही रिव्हर्स मॉर्गेजचा फायदा घेऊ शकता.
रिव्हर्स मॉर्गेज हे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्पन्नाचे साधन ठरू शकते. मात्र, रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय ? ते कसे काम करते व याचे फायदे-तोटे काय आहेत ? हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.
रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय ?
घर खरेदी करताना आपल्याला बँकेकडून कर्ज तर मिळते. मात्र या कर्जाची फेड नियमित हफ्त्यांमध्ये करावी लागते. या उलट रिव्हर्स मॉर्गेजमध्ये घर तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेता येते व हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दरमहिन्याला हफ्ता भरावा लागत नाही.
थोडक्यात, बँक घराच्या तारणावर तुम्हाला एकरकमी अथवा दरमहिन्याला पैसे देते. रिव्हर्स मॉर्गेज अंतर्गत तुम्हाला किती कर्ज मिळेल हे घराच्या मुल्यानुसार ठरते. या कर्जाचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष असतो. हा कालावधी संपल्यानंतर तुम्ही कर्जाची परतफेड करून तारण ठेवलेले घर सोडवू शकता. ज्येष्ठ नागरिक दरमहिन्याला रिव्हर्स मॉर्गेजच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा वापर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकतात.
निवृत्तीनंतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी होईल रिव्हर्स मॉर्गेजची मदत
नियमित उत्पन्नाचा मार्ग | निवृत्तीनंतर पगारातून येणारे उत्पन्न थांबलेले असते. अशावेळी रिव्हर्स मॉर्गेजची मदत घेऊ शकता. 60 वर्ष पूर्ण केलेली व स्वतःच्या नावावर घर असलेली कोणतीही व्यक्ती रिव्हर्स मॉर्गेजची मदत घेऊ शकते. अतिरिक्त खर्च पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होईल. |
कर्जाची परतफेड | रिव्हर्स मॉर्गेजमध्ये तुम्हाला त्वरित कर्जाची परतफेड करण्याची गरज नसते. या कर्जाचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष असतो. या कालावधीमध्ये तुम्हाला नियमितपणे पैसे मिळत राहतात. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शक्य असल्यास कर्जाची परतफेड करू शकता. |
स्वतःच्या घरात राहू शकता | रिव्हर्स मॉर्गेजचा कालावधी हा 15 ते 20 वर्ष असतो. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर कर्जाची परतफेड केली नाही तरीही स्वतःच्या घरात राहता येते. थोडक्यात, व्यक्ती जिंवत असे पर्यंत घराचा ताबा स्वतःकडेच असतो. |
रिव्हर्स मॉर्गेजचे तोटे
दरमहा मिळणारी रक्कम कमी | निवृत्तीनंतर उत्पन्नासाठी रिव्हर्स मॉर्गेज हा चांगला पर्याय असला तरीही यातून मिळणारी रक्कम ही घराच्या किंमतीच्या तुलनेत खूपच कमी असते. या रक्कमेतून तुमचा दैनंदिन खर्च, हॉस्पिटल व इतर खर्च पूर्ण होईलच असे नाही. याशिवाय, या कर्जावरील व्याजदर देखील जास्त असते. |
घराची मालकी | रिव्हर्स मॉर्गेजची परतफेड न केल्यास घराची मालकी गमवण्याची शक्यता असते. तुमच्या हयातीत घरात राहू शकता. परंतु, कर्जाची परतफेड न केल्यास बँक घराची विक्री करून कर्ज वसूल करू शकते. यामुळे घरातील इतर सदस्यांसाठी समस्या निर्माण होऊ शकते. |
कुटुंबावर कर्जाचा बोजा | तुमच्या नावावरील कर्ज हे कुटुंबासाठी ओझे ठरू शकते. घराची मालकी स्वतःकडेच राहावी यासाठी कुटुंबाला कर्जाची परतफेड करावी लागते. तसेच, बँकेने कर्जवसूलीसाठी घराची विक्री केल्यास कुटुंबातील इतर सदस्यांना राहते घर सोडावे लागू शकते. |