Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Insurance Benefits : प्रवास विम्याचे मुख्य आणि महत्त्वाचे फायदे जाणून घ्या आणि फिरा बिनधास्त

Travel Insurance Benefits :  प्रवास विम्याचे मुख्य आणि महत्त्वाचे फायदे जाणून घ्या आणि फिरा बिनधास्त

देशात किंवा परदेशात प्रवास करण्यापूर्वी प्रवासादरम्यान होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तर आज आपण प्रवासी विमा म्हणजे काय (Travel Insurance)? आणि त्याचे फायदे कायकाय आहेत ते पाहणार आहोत.

प्रवासात बऱ्याचदा सामानाची  चोरी  होते; दुर्घटना होतात. कधी फ्लाईट कॅन्सल होते किंवा एरअपोर्टवर पोहचायला विलंब तरी होतो. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होते. त्याचबरोबर ठरवलेल्या नियोजनाची पुरती वाट लागते. या अशाप्रकारच्या आर्थिक नुकसानीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रवासी विमा (ट्रॅव्हल इन्श्युरन्स) आवश्यक आहे. व्यवसाय, शिक्षण, फॅमिली टूरनिमित्त आपण देशात आणि परदेशात जात असाल तर ट्रॅव्हल इन्श्युरन्सबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. प्रवासातील अडचणी या सांगून येत नाहीत. वैयक्तिक पातळीवर कितीही नियोजन केले तरी काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. अशावेळी आपल्याकडे ट्रॅव्हल इन्श्युरन्स असेल तर होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून काढता येऊ शकते.

तुम्ही कोणत्याही प्रकारचे पर्यटन करत असाल तर तिकीट बूक करण्यासोबत ट्रॅव्हल इन्श्युरन्स काढून घेण्याची सवय लावा. बऱ्याच लोकांना ट्रॅव्हल इन्श्युरन्सबद्दल माहिती नसते. त्याचा उपयोग काय, असे समजून त्याच्याकडे कानाडोळा केला जातो. पण काही अधिकचे पैसे भरून तुम्ही तुमच्या प्रवासातील काही घटनांमधून होणारे आर्थिक नुकसान भरून काढू शकता.

What is Travel Insurance? प्रवास विम्याबद्दल माहिती

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही फक्त काही रुपयांचा प्रवास विमा घेऊ शकता. पण या काही रूपयांच्या प्रवास विम्यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर दिले जाते. ही एक पर्यायी सेवा आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा विमा काढू शकता. नको असेल तर सोडून देऊ शकता. प्रवास विम्यामध्ये, प्रवासात सामान हरवले किंवा चोरीला गेल्यास किंवा कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवल्यास वैद्यकीय सेवा पुरविण्याची सोय असते.

प्रवास विम्यातील प्रचलित दोन प्रमुख प्रकार
१. आंतरराष्ट्रीय विमा पॉलिसी : विविध कामानिमित्त परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी हा विमा आहे. या विम्याद्वारे अचानकपणे उद्भवलेल्या वैद्यकीय अडचणी, सामान हरवणे, प्रवासामध्ये होणारा उशीर इत्यादी पासून संरक्षण मिळते.
२. स्वदेशी विमा पॉलिसी : ही पॉलिसी भारतामधील प्रवासादरम्यान काढली जाते. यात वैद्यकीय संरक्षणाबरोबरच, कायमस्वरूपी येणारे अपंगत्व आणि प्रवासादरम्यान मृत्यू झाल्यास, सामान हरवल्यास, वेळेत विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यास त्याचा मोबदला मिळण्याची तरतदू या विम्यामध्ये आहे.

प्रवासी विमा खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचे संरक्षण करायचे आहे किंवा किती लोकांचे संरक्षण करायचे आहे, हे ठरवणे आवश्यक आहे. याद्वारेच तुम्ही तुमचा सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.

वैयक्तिक संरक्षण (Personal protection)
वैयक्तिक संरक्षण या प्रकाराद्वारे तुम्ही एका व्यक्तीसाठी किंवा संपूर्ण ग्रुपसाठी संरक्षण विकत घेऊ शकता. यातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पॉलिसीतून विविध पर्याय निवडू शकता:

कॉर्पोरेट प्रवास विमा (Corporate travel insurance)
हा प्रकार विशेषत: कर्मचार्‍यांच्या व्यावसायिक प्रवासांसाठी वापरला जातो. या पॉलिसीत देशांतर्गत आणि परदेशातील संरक्षणाचा समावेश आहे. वैयक्तिक संरक्षणाबरोबरच यात वैयक्तिक सामान, व्यावसायिक उपकरणे जसे की लॅपटॉप आणि टॅब्लेट्स आणि अतिरिक्त प्रवास खर्च जसे कनेक्टिंग फ्लाईट चुकणे इत्यादींचा समावेश आहे.

विद्यार्थी विमा (Student insurance)
जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिकण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी हा विमा अत्यावश्यक आहे. यात विद्यार्थ्यांच्या तातडीच्या वैद्यकीय खर्चासहित पासपोर्ट हरवणे, वैद्यकीय कारणासाठी परत पाठवणे अशा काही विशिष्ट लाभांचे संरक्षण देण्यात आले आहे.

कौटुंबिक पॉलिसी (Family policy)
या पॉलिसीत तुमचे संपूर्ण कुटुंब संरक्षित केले जाते. पती-पत्नी, मुले, आई-वडिल यांच्यासोबत सासू-सासरे आणि नातेवाईकांचाही समावेश केला जातो. या पॉलिसीमधील लाभ हे इतर प्रवासी पॉलिसीप्रमाणेच असतात.

ज्येष्ठ नागरिक प्रवास विमा (Senior Citizen Travel Insurance)
या योजना परदेशी प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण देतात. वयाची 61 ते 70 वर्षे झालेल्या व्यक्तींना यामध्ये संरक्षण दिले जाते. परदेशातील मुलांना भेटायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विमा चांगला असल्याचे मानले जाते. हा विमा देशांतर्गत आणि परदेश अशा दोन्ही प्रवासांसाठी वापरला जाऊ शकतो.

benefits of travel insurance प्रवासी विम्याचे फायदे

प्रवासात होणारी चोरी, विमान उड्डाणातील विलंब, सामानाचे नुकसान, आजारपण, दुर्घटना इत्यादी असंख्य बाबींमध्ये होणाऱ्या आर्थिक नुकसानीसाठी हा विमा फारच उपयुक्त असतो. पाहुया याचे फायदे.

ट्रीप कॅन्सेलेशन कव्हर : कधी  कधी अचानक उद्भवणाऱ्या  कारणांमुळे  ट्रीप कॅन्सल करावी लागते. 24 तास आधी जर तुम्ही  कॅन्सलेशन केले आणि तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स असेल तर तुमच्या तिकिटाचे शुल्क विमा कंपनीकडून भरून मिळते.

विमान उड्डाणात विलंब : जर तुम्हाला एखाद्या बिझनेस मीटिंगला जायचे असेल आणि तुमच्या विमानाच्या उड्डाणाला उशिर झाला. तर अशावेळी तुम्ही विमा घेतलेला असल्यास तुम्हाला त्याचा आर्थनिक मोबदला मिळू शकतो.


विमान उड्डाणात सूट : तुमच्या विमानास विलंब होत असेल आणि तुमची कनेक्टिंग  फ्लाईट चुकण्याची  शक्यता  असेल, तर अशावेळी  तुमचा विमा असेल तर चुकलेल्या  कनेक्टिंग फ्लाईटचा खर्च तुम्हाला विमा कंपनीकडून परत मिळू शकतो.

मेडिकल कव्हर : जर प्रवासात तुमची तब्येत अचानक बिघडली आणि तुम्हाला तातडीची वैद्यकीय सेवा, डॉक्टरांचे उपचार किंवा अडमिट होण्याची गरज लागली तर तुम्हाला हा सर्व खर्च विम्यातून  परत मिळू शकतो.

नॉन  मेडिकल लॉस : प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल,  लॅपटॉप, पासपोर्ट, लायसन्स इत्यादी महत्त्वाच्या वस्तू चोरीला  गेल्या तर ट्रॅव्हल इन्श्युरन्समधून त्याचा आर्थिक मोबदला मिळ शकतो. म्हणून पर्यटनासाठी किंवा सहलीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चासोबत थोडा खर्च विम्यासाठी केला तर तुमचा प्रवास आणखी सुखद होईल आणि तुमचे  आर्थिक नुकसान ही होण्यापासून संरक्षण मिळेल.