तुमचे आर्थिक जीवन सुरक्षित करायचे असेल, तर पैशांच्या गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे आहे. हा इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. गुंतवणूक तज्ज्ञ लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि टर्म इन्शुरन्स (Term Insurance) खरेदी करण्याचा सल्ला देतात. मात्र पॉलिसीधारकाचा बऱ्याच वेळेला यामध्ये गोंधळ उडतो. या दोन्ही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नेमका फरक काय? हे त्याला समजत नाही. जर तुम्हीही तुमच्या उज्वल भविष्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणार असाल, तर टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधील फरक जाणून घ्या.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
'टर्म इन्शुरन्स' (Term Insurance) हा जीवन संरक्षण पॉलिसीचाच एक प्रकार आहे. जो विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट वर्षासाठी सुरक्षितता पुरवतो. टर्म पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास आणि ती पॉलिसी सक्रिय असल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला मृत्यूलाभ म्हणून एक मोठी रक्कम दिली जाते. यामुळे पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते.
काही पॉलिसी कंपन्या ठराविक वर्षानंतर कंपनीच्या नियमानुसार फायदे कमी करतात किंवा वाढवून देतात. अनेक कंपन्या टर्म पॉलिसी कायमस्वरूपी पॉलिसीमध्ये रूपांतरित करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देतात. इतर पॉलिसीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रीमियममध्ये मोठा कव्हर या पॉलिसीमध्ये घेता येतो. हेच या पॉलिसीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय?
'लाईफ इन्शुरन्स पॉलिसी' (Life Insurance) नावाप्रमाणे लाईफ कव्हर प्रदान करते, पॉलिसीच्या मुदती दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला क्लेमची रक्कम दिली जाते. लाईफ इन्शुरन्सचे टर्म प्लॅन, चाइल्ड लाईफ, मनी बॅक, युलिप, एंडोमेंट प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन आणि होल लाईफ प्लॅन असे 7 प्रकार आहेत.
आपण आपल्या गरजेनुसार इन्शुरन्स निवडू शकतो. आता तर इन्शुरन्स फक्त “लाईफ कव्हर” म्हणून मर्यादित राहिले नसून, त्याकडे अगदी वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत करता येऊ शकणारी “दीर्घकालीन गुंतवणूक” म्हणून देखील पाहिले जाऊ लागले आहे.
टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधील मुख्य फरक जाणून घ्या
टर्म इन्शुरन्स प्रामुख्याने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यावर भर देतो. याउलट लाईफ इन्शुरन्समध्ये आर्थिक सुरक्षेसोबत संपत्ती निर्मिती आणि इतर आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करणे या गोष्टींना देखील महत्त्व देतो.
टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम हा सर्वात कमी असतो. याचे कारण असे की, हा केवळ आर्थिक सुरक्षा प्रधान करतो. मात्र लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम हा सर्वात जास्त असतो. यामध्ये सुरक्षिततेसह गुंतवणुकीचा देखील विचार केला जातो.
टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा एक निश्चित कालावधी असतो. या कालावधीतील प्लॅन संपल्यानंतर, जर पॉलिसीधारकाने प्लॅन रिन्यू केला नाही, तर ती पॉलिसी बंद होते. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा गुंतवणूक कालावधी जास्त असतो, कारण यामध्ये पॉलिसीधारकाच्या संपूर्ण आयुष्यातील कालावधीचा समावेश करण्यात आलेला असतो.
टर्म इन्शुरन्सवर पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. मात्र लाईफ इन्शुरन्सच्या खरेदीनंतर पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
टर्म इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळत नाहीत. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतरच यातील सुविधेचा लाभ घेता येतो. मात्र लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ मिळू शकतो. हा फायदा प्रत्येक पॉलिसीनुसार बदलू देखील शकतो.
Source: hindi.financialexpress.com