सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व दुर्बल घटकांच्या कल्याणाचे काम निरंतर सुरु आहे. त्या अंतर्गत नवनवीन व अभिनव योजना हाती घेण्यात येत आहे. तसेच पूर्वीच्या योजनांमधील उणीवा दूर करुन त्या योजना अधिकाधिक सक्षमरित्या लोकाभिमुख करण्याचे काम केले जात आहे.
समाजाच्या विकासासाठी समाजातील मागास आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. आजही मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अशा मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, या दृष्टीने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व योजनांची अंमलबजावणी केली जाते.
परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
यात प्रामुख्याने अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेणे कठीण असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश मिळाला आहे, अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 26 व पीएचडी अभ्यासक्रमासाठी 24 विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
कोण-कोणता खर्च शिष्यवृत्तीतून मिळतो
या शिष्यवृत्ती अंतर्गत परदेशातील संबंधित विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या अभ्यासक्रमाची संपूर्ण फी आणि इतर खर्च मंजूर करण्यात येतो. त्यानुसार अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी 14 हजार अमेरिकन डॉलर तर ब्रिटनसाठी 9 हजार पौंड इतका वार्षिक निर्वाह भत्ता विद्यार्थ्यास देण्यात येतो. याशिवाय प्रामुख्याने पुस्तके, अभ्यास दौरा इत्यादी खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी 1375 अमेरिकन डॉलर तर ब्रिटनसाठी 1 हजार पौंड इतकी रक्कम देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना झालेला विमान प्रवास खर्च (shortest route & Economy Class) तिकीट सादर केल्यानंतर तो मंजूर करण्यात येतो. तर आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचे भाडे अॅडव्हान्समध्ये देण्यात येते. तर याव्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक आहे; त्या विद्यार्थ्याना मिळणारा विमान प्रवास खर्चाचा लाभ जुन्या नियमानुसारच देण्यात येतो.
शिष्यवृत्तीसाठी पात्रता
- विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असणे आवश्यक असते.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्याचे वय 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50 टक्के गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
समाजातील मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक पात्र इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनी परदेशातील शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीचा जरूर लाभ घ्यावा व त्या अनुषंगाने स्वत:च्या विकासाबरोबर समाजाचा व राष्ट्राचाही विकास साधावा, अशी या शिष्यवृत्तीमागे सरकारची भूमिका आहे. शिष्यवृत्तीशी संबंधित माहिती आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या कार्यालयातून मिळेल.