टोलनाक्यावरील वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगा टाळण्यासाठी सरकारद्वारे फास्टॅग सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनचालकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याचे व वेगवेगळ्या वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे आता NHAI वाहनचालकांना 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहेत.
तुम्ही देखील कामानिमित्ताने वाहनांचा वापर करत असाल तर लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. फास्टॅग केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करू शकता, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
फास्टॅग केवायसीचा निर्णय का?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( NHAI) वाहनचालकांना आरबीआयच्या निर्देशानुसार 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. जे वाहनचालक या कालावधीच्याआधी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांचे फास्टॅग हे निष्क्रिय होतील.
NHAI ने एक वाहन, एक फास्टॅग या उपक्रमांतर्गत हा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश वेगवेगळ्या वाहनांसाठी एकच किंवा एकाच वाहनांसाठी अनेक फास्टॅग लिंक करण्यापासून रोखणे हा आहे. तसेच, याआधी एकापेक्षा जास्त फास्टॅगचा वापर करत असल्यास ते त्वरित बंद करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.
फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल?
- तुम्ही केवायसी प्रक्रिया बँकेत जाऊन किंवा IHMCL च्या वेबसाइटवरून पूर्ण करू शकता.
- ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला https://fastag.ihmcl.com या साइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाकून लॉग इन करा.
- आता My Profile या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे केवायसी स्टेट्स पर्यायावर जा. त्यानंतर केवायसी टॅबवर क्लिक करून Customer Type निवडा.
- त्यानंतर मागितलेली माहिती भरा. तसेच, आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फास्टॅग अपडेट होईल.
तुम्ही फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेत जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. फास्टॅग केवायसी अपडेट फॉर्म व कागदपत्रे जमा केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास 7 दिवस लागतात.
फास्टॅग केवायसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
- ड्राइव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- पॅन
- आधार
- वाहन नोंदणी ( Registration Certificate – RC) प्रमाणपत्र
तसेच, केवायसी अपडेटमुळे फास्टॅग वॉलेटमध्ये असलेल्या पैशांच्या मर्यादेवर देखील परिणाम होईल. केवायसी पूर्ण नसल्यास फास्टॅग वॉलेटमध्ये महिन्याला 10 हजार रुपये व वर्षाला 1 लाख रुपयेच ठेवता येत असे. मात्र, आता केवायसीमुळे फास्टॅग वॉलेटमध्ये कोणत्याही कालावधीत 1 लाख रुपये ठेवता येतील.