आयपीएल 2024 च्या लिलावाची प्रक्रिया 19 डिसेंबरला पार पडणार आहे. या लिलावाचे दुबईत आयोजन करण्यात आले आहे. लिलावाआधी खेळाडूंच्या अदलाबदलीची प्रक्रिया पार पडली. यात सर्वाधिक चर्चा हार्दिक पांड्याची झाली.
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा गुजरातचा संघ सोडून मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. लिलावाच्या आधी खेळाडूंच्या अदलाबदलीसाठी ठराविक कालावधी दिला जातो. याला ट्रेड विंडो असे म्हटले जाते. आयपीएलमधील प्लेअर ट्रेड संकल्पना नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊया.
आयपीएलमध्ये प्लेअर ट्रेड संकल्पना काय आहे?
लिलावाआधी खेळाडूच्या अदलाबदलीसाठी ठराविक कालावधी दिला जातो. या कालावधीला ट्रेडिंग विंडो म्हणतात. ट्रेडिंग विंडो अंतर्गत एक संघातील दुसऱ्या संघात जातो. हा व्यवहार संपूर्णपणे पैशांच्या स्वरुपात किंवा खेळाडूच्या बदल्यात होतो. म्हणजेच, एक संघ दुसऱ्या संघातील खेळाडुला पैसे देऊन किंवा स्वतःच्या संघातील खेळाडू त्या संघाला देऊन खरेदी करू शकतो.
पैशांच्या व्यवहारात खेळाडूंच्या मूळ किंमतीसह ट्रान्सफर फीचा देखील समावेश असते. हार्दिक पांड्या व कॅमेरून ग्रीनचा व्यवहार देखील पैशांच्या (all-cash deal) स्वरुपात झाला. गुजरातने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी मुंबईला देखील तेवढीच रक्कम खर्च करावी लागली. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने 17.50 कोटी रुपये खर्चून खरेदी केले.
याआधी देखील खेळाडूंची अदलाबदली झाली आहे का?
हार्दिक पांड्याने गुजरातचा संघ सोडून मुंबईकडे जाणे हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑल-कॅश व्यवहार आहे. मात्र, प्लेअर ट्रेड संकल्पना पहिल्यांदाच लागू करण्यात आलेली आहे, असे नाही. आयपीएलच्या सुरुवातीपासून खेळाडूंची अदलाबदली केली जात आहे. 2009 साली मुंबई इंडियन्से दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आशिष नेहराच्या बदल्यात शिखर धवनला घेतले होते. याशिवाय, अशा व्यवहारांमध्ये खेळाडूची सहमती देखील आवश्यक असते.
अदलाबदलीच्या व्यवहार खेळाडूंना ट्रान्सफर फी मिळते का?
खेळाडूच्या बदल्यात खेळाडूची अदलाबदली केल्यास पैशाचा संबंध येत नाही. परंतु, ऑल-कॅश डीलमध्ये खेळाडूच्या किंमतीसह ट्रान्सफर फीचा देखील समावेश असतो. एखाद्या संघाने ऑल-कॅश डीलमध्ये खेळाडूला खरेदी केल्यास ट्रान्सफर फी देखील द्यावी लागते.
ट्रान्सफर फी कितीही रुपये असू शकते. या रक्कमेचा खुलासा केला जात नाही व संघाजवळ लिलावासाठी उपलब्ध असलेल्या पैशांवर देखील याचा परिणाम होत नाही. समजा, अशा व्यवहारात 25 कोटी रुपये ट्रान्सफर फी दिली जाणार आहे. अशावेळी खेळाडू देखील यात स्वतःचा हिस्सा मागू शकतो. मात्र, करारानुसार ट्रान्सफर फीची रक्कम खेळाडूला द्यायची की नाही हे ठरते.
दरम्यान, आधी 26 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या ट्रेड विंडोचा कालावधी 12 डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे. तर 19 डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडेल. लिलावादरम्यान खेळाडूंना खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघासाठी ठराविक रक्कम निश्चित केली जाते. गेल्यावर्षी पार पडलेल्या लिलावात प्रत्येक संघाकडे 95 कोटी रुपये होते. संघ खेळाडूंच्या खरेदीनंतर शिल्लक राहिलेली रक्कम व यावर्षीचे अतिरिक्त 5 कोटी रुपयांसह यावर्षी लिलावात सहभागी होतील.