मुलं जसंजशी मोठी होत जातात, तसा त्याचा खर्चही वाढत जातो. शिक्षण, लग्नापासून ते स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे पालकांनी आधीपासूनच मुलांच्या नावाने गुंतवणूक केलेली असल्यास याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.
एलआयसीकडे अशा अनेक शानदार गुंतवणूक योजना आहेत, ज्याद्वारे तुम्ही मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. विशेष म्हणजे या योजनांमधील गुंतवणूक खूपच कमी आहे. एलआयसीची Children’s Money Back Plan अशीच एक चांगली गुंतवणूक योजना आहे. या योजनेत दिवसाला केवळ 150 रुपये गुंतवल्यास, मुलं 25 वर्षांची झाल्यावर तब्बल 19 लाख रुपये मिळतील. एलआयसीची ही लहान मुलांसाठीची गुंतवणूक योजना काय आहे व याचा फायदा कसा मिळेल? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
गुंतवणूक
एलआयसीने ही विमा पॉलिसी लहान मुलांसाठी सुरू केली आहे. पालक 0 ते 12 वर्ष वय असलेल्या मुलाच्या नावाने या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही पद्धतीने प्रीमियमची रक्कम भरण्याची सुविधा मिळते. यामध्ये तुम्हाला वर्षाला कमीत कमी 50 हजार रुपये ते 55 हजार रुपये गुंतवावे लागतील.
मुलाच्या वयानुसार विम्याची रक्कम ठरते. दरवर्षी सर्वसाधारणपणे 44,616 रुपये प्रीमियम भरावा लागेल. अशाप्रकारे, मुलाची वयाची 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी रक्कम व बोनस रक्कमेसह जवळपास 19 लाख रुपये मिळतील.
मॅच्युरिटी कालावधी
या विमा पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी हा 25 वर्ष आहे. म्हणजेच मुलांचे वय 25 वर्ष झाल्यावर संपूर्ण रक्कम परताव्यासह परत मिळेल. विशेष म्हणजे विमाधारक 18 वर्ष, 20 वर्ष आणि 22 वर्षांचा झाल्यानंतर मूळ विमा रक्कमेच्या 20 टक्के रक्कम बोनस स्वरुपात प्राप्त होते. तसेच, वयाची 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी रक्कम, बोनससह 19 लाख रुपये विमाधारकाला मिळतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
योजनेचे इतर फायदे
एलआयसीच्या या योजनेद्वारे विमाधारकाला इतरही अनेक फायदे मिळतात. या पॉलिसीचा लॉक इन कालावधी हा 2 वर्ष आहे. पॉलिसीला 3 वर्ष झाल्यावर विमाधारकाला यावर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते. कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना विमा रक्कम व बोनस रक्कम दिली जाते. तसेच, विमाधारकाला पॉलिसीशी संबंधित कोणत्याही नियम व अटी मान्य नसल्यास पॉलिसी खरेदी केल्याच्या 15 दिवसांच्या आत रद्द करण्याचीही सुविधा मिळते.