Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Retiring Room: आता ट्रेनला उशीर झाला तर 'इथं' राहून करा गाडीची प्रतीक्षा, दरही माफक

IRCTC Retiring Room

Image Source : www.rail.in

IRCTC Retiring Room: रेल्वेच्या गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूमची (Retiring Room) सेवा सुरु केली आहे. या अंतर्गत प्रवाशांना माफक दरात रूम उपलब्ध करून दिल्या जातात. या रूममध्ये कोणत्या सुविधा मिळतात, त्याकरिता भाडे किती, रूम कशी बुक करता येईल यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

भारतातील बरेच लोक आजही मोठ्या संख्येने रेल्वेमधून प्रवास करतात. रास्त तिकिटाचा दर आणि सर्वोत्तम सुविधा मिळत असल्याने लोकांनी रेल्वेला पसंती दिली आहे. बऱ्याचदा काही अडचणींमुळे रेल्वे उशिराने धावते. अशा परिस्थितीत प्रवाशांना एकतर स्टेशनवर वेळ काढावा लागतो किंवा हॉटेलच्या खोल्यांचा सहारा घ्यावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने रिटायरिंग रूम (Indian Railway Retiring Room) ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये प्रवाशांना कन्फर्म तिकिटावर  20 ते 40 रुपयांमध्ये 48 तासांसाठी आलिशान रूम बुक करता येते. ही सुविधा प्रवाशांना बहुतांश प्रमुख रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळेल. नेमकी काय आहे ही सुविधा? चला जाणून घेऊयात...

रिटायरिंग रूम नक्की काय आहे?

भारतीय रेल्वेने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रिटायरिंग रूम (Retiring Room) तयार केल्या आहेत. प्रमुख रेल्वे स्थानकावर ही सोय देण्यात आली असून जर तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट (Confirm Ticket) असेल, तर तुम्ही  या रूम  सहज बुक करू शकता. फक्त 40 रुपयांमध्ये तुम्हाला 48 तास रेल्वेच्या आलिशान रूममध्ये राहण्याची सुविधा मिळते.

या रूममध्ये सिंगल, डबल बेड, एसी (AC Room) आणि नॉन एसी (Non AC Room) अशा कॅटेगरी उपलब्ध आहेत. रेल्वेच्या रिटायरिंग रूमचा लाभ घेण्यासाठी प्रवासी, तिकिटावरील PNR नंबर वापरून रूम बुक करू शकतात. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (First come first served) या तत्त्वावर रिटायरिंग रूमचे वाटप केले जाते. जर रिटायरिंग रूम अगोदरच संपूर्ण बुक असतील, तर तुमचे नाव वेटिंग लिस्टमध्ये (Waiting List) राखून ठेवण्यात येते आणि खोल्या रिकाम्या होताच तुम्हाला बुकिंग उपलब्ध करून दिले जाते.

रिटायरिंग रूम सेवा देणारी भारतातील 500 हून अधिक रेल्वे स्थानके

erail.in या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भारतातील 500 हून अधिक रेल्वे स्थानकांवर रिटायरिंग रूम ही सुविधा दिली जाते.

IRCTC Retiring Room Stations

रूममध्ये कोणत्या सुविधा मिळतात?

रिटायरिंग रूममध्ये पुरवल्या जाणार्‍या सुविधा या रूमच्या श्रेणीनुसार आणि त्या ज्या रेल्वे स्टेशनवर आहे, त्यावर अवलंबून असतात. त्यामध्ये सामान्यतः एक बेड (Bed), शौचालय (Toilet), खुर्ची आणि टेबल (Chair and Table) समाविष्ट असते. काही खोल्यांमध्ये टीव्ही (TV), टेलिफोन (Telephone) आणि पिण्याच्या पाण्याची (Drinking Water Facility) सुविधा देखील देण्यात येते.

रूममध्ये राहण्याची सोय कशी असते?

  • एक प्रवाशासाठी एका रूममध्ये सिंगल बेड किंवा डबल बेड उपलब्ध करून देण्यात येतो 
  • दोन व्यक्तींसाठी एका रूममध्ये 1 डबल बेड किंवा 2 सिंगल बेड उपलब्ध असतात 
  • तीन व्यक्तींसाठी एका रूममध्ये 1 डबल बेड आणि 1 सिंगल बेड किंवा 3 सिंगल बेड उपलब्ध असतात  
  • चार व्यक्तींना राहण्यासाठी एका रूममध्ये 2 डबल बेड किंवा 4 सिंगल बेड उपलब्ध करून देण्यात येतात 
  • याशिवाय पाच जणांना राहण्यासाठी एका रूममध्ये 2 डबल बेड किंवा 5 सिंगल बेड देण्यात येतात

यासाठी किती भाडे द्यावे लागते?

IRCTC च्या वेबसाईटवरील माहितीनुसार या रूम्ससाठी रेल्वे प्रवाशांकडून कमीत कमी शुल्क आकारते, जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला या सेवेचा लाभ घेता येईल.

  • IRCTC कडून 24 तासांसाठी 20 रुपये आकारले जातात. तर डॉर्मेटरी रूमसाठी प्रवाशांना फक्त 10 रुपये द्यावे लागतात 
  • याशिवाय 24 ते 48 तास रिटायरिंग रूमचा लाभ घेण्यासाठी 40 रुपये मोजावे लागतात 
  • प्रवाशांना 48 तासांच्या शयनगृहातील बेडसाठी 20 रुपये द्यावे लागतील. तुम्ही या रूम 1 तास ते 48 तासांपर्यंत बुक करू शकता

रूम बुकिंग संदर्भात अट काय?

रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर एसी (AC Room) आणि नॉन एसी (Non AC Room) अशा दोन प्रकारच्या रिटायरिंग रूम उपलब्ध असतात. तुम्ही इंटरनेटद्वारे रिटायरिंग रूमची आगाऊ (Advance) बुकिंग करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कन्फर्म तिकीट किंवा आरएसी (Reservation Against Cancellation) असणे आवश्यक आहे. वेटिंग तिकीट, कार्ड तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट यांच्या बाबतीत रिटायरिंग रूमची सुविधा दिली जात नाही. मात्र, जर तुमच्याकडे 500 किमीपेक्षा जास्त अंतराचे जनरल तिकीट (General Ticket) असेल, तर अशा प्रवाशांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता येतो.

बुकिंगसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत?

रिटायरिंग रूम बुक करण्यासाठी प्रवाशाला फोटो ओळखपत्र, पासपोर्ट (Passport), पॅन कार्ड(Pan Card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence), आधार कार्ड (Aadhar Card) या कागदपत्रांचा वापर करून बुकिंग करता येते.  

रिटायरिंग रूम कशी बुक करावी?

  • IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि मुख्य मेनू आयकॉनवर क्लिक करा, त्यानंतर रिटायरिंग रूम निवडा किंवा थेट लिंकवर क्लिक करा: https://www.rr.irctctourism.com/#/accommodation/in/ACBooklogin  
  • तुम्ही IRCTC खात्यात लॉग इन करा
  • तुमचा पीएनआर (PNR) क्रमांक प्रविष्ट (Enter) करा आणि सर्चवर क्लिक करा
  • कोणत्या स्टेशनवर राहायचे ते ठरवा, त्यानुसार स्टेशन निवडा आणि डेस्टिनेशन बुक करा
  • आता चेक-इन/चेक-आउटची तारीख भरा, बेडचा आणि रूमचा प्रकार जसे की, एसी किंवा नॉन एसी प्रविष्ट (Enter) करा, त्यानंतर रूमची उपलब्धता तपासा 
  • रूम नंबर, कालावधी आणि आयडी कार्ड प्रकार निवडा
  • पुढे जा (Next) या बटणावर क्लिक करा आणि पेमेंट करा

रिटायरिंग रूम कॅन्सल करता येते का?

यासंदर्भात रेल्वेने काही नियम आखून दिले आहेत. त्यानुसार रिटायरिंग रूम जर बुक केली असेल, तर रद्द करता येते, मात्र ठराविक कालावधीनुसार पैसे कापण्यात येतात.

  • नियम 1: चेक इनच्या 48 तासांपूर्वी रिटायरिंग रूम कॅन्सल केल्यास, एकूण रकमेपैकी 10% रकमेची कपात केली जाते 
  • नियम 2: जर तुम्ही चेक इनच्या 48 तासांच्या दरम्यान रिटायरिंग रूम कॅन्सल केली तर, तुमच्या एकूण रकमेपैकी 50% रकमेची कपात केली जाते 
  • नियम 3: तुम्ही रिटायरिंग रूम चेक इनच्या दिवशी कॅन्सल केल्यास 100% रकमेची कपात केली जाते 
    वेगवेगळ्या प्रवासी रूम रद्द करण्याची परवागी नाही, पूर्ण रूम एकाच वेळी रद्द करता येते 
  • नियम 4: जर एकापेक्षा जास्त रूम बुक केल्या असतील आणि त्यातील काही रूम्स रद्द करायच्या असतील तर, नियम 1, 2 आणि 3 नुसार अंमलबजावणी केली जाते