राज्यातील फळबाग शेती विकासाकरिता कृषी विभाद्वारे भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजना रावबिण्यात येते. 2018-19 सालापासून ही योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे.
योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% असे तीन वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण नियमानुसार राखणे आवश्यक आहे.
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीत जास्त ६ हेक्टर इतक्या मर्यादेत योजनेचा लाभ घेऊ शकतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरित क्षेत्रासाठी (वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून) लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात. अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिता 100 % अनुदान देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यास पात्रता
1) लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.
2) सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व मुले अशी आहे)
3) लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळेल. संस्थात्मक लाभार्थ्यांना मिळणार नाही.
4) शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
5) 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
6) परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
7) इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
1) 7/12 व 8-अ उतारा
2) हमीपत्र
3) संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
4) जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी)