मुंबई: बीडीडी (BDD) चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेनंतर आता कामाठीपुऱ्याचा (Kamathipura Redevelopment) देखील विकास होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतला असून लवकरच विकास कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेद्वारे २७ एकर जागेवरील आठ हजार २३८ रहिवाशांना ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका मोफत दिल्या जाणार आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कामाठीपुऱ्याचा विकास होणार आहे.
आजघडीला कामाठीपुऱ्यात १०० वर्षांहून अधिक जुन्या सुमारे ९४३ उपक्रमप्राप्त इमारती असून त्यात जवळपास ८५०० रहिवासी राहतात. तसेच ३४९ बिगर उपक्रमप्राप्त इमारती असून १४ धार्मिक स्थळे देखील आहेत. जीर्ण इमारती, अरुंद रस्ते, सोयीसुविधांचा आभाव हे मुद्दे लक्षात घेता कामाठीपुऱ्याचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी ‘म्हाडा’ला नियोजन प्राधिकरण म्हणून सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
पुनर्विकासाची रचना अशी असेल:
मिनी क्रिकेट ग्राऊंड, थीम पार्क, क्लब हाऊस, उद्यान, व्यायामशाळा, जॉगिंग पार्क, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, ॲम्फीथिएटर, कार पार्किंग, दुचाकी पार्किंग, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, उत्तम गुणवत्तेचे सरकते जिने, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सोसायटी ऑफिस, बोअर वेल, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, पोडियम पार्किंग आदी सुविधा नागरिकांना दिल्या जाणार आहेत. याबाबत आधीच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय देखील तपासून बघितले जाणार आहेत.
काय आहे कामाठीपुऱ्याची ओळख?
सात बेटांचे शहर म्हणून मुंबई मायानगरी ओळखली जाते. ही सात बेटे एकमेकांना जोडताना मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी तेलंगणातून कामाठींना येथे आणले गेले. ते ज्या भागात राहू लागले तो भाग कामाठीपुरा म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे मुंबई विस्तारत गेली आणि शरीरविक्री करणाऱ्या महिलांनी येथे आपली वस्ती बनवली. त्यामुळे मुंबईच्या या वस्तीकडे वाईट नजरेने पाहिले जाऊ लागले. मुंबई सेंट्रल (Mumbai Central), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), भायखळा (Byculla) अशा मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणाजवळ कामाठीपुरा आहे. सरकारी निर्णयामुळे येणाऱ्या काळात कामाठीपुऱ्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच तेथील रहिवाशांना राहण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे स्वतःचे घर देखील मिळणार आहे.