नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा दिनक्रम ठरलेला असतो. मात्र, निवृत्ती घेतल्यानंतर नक्की काय करावे? असा प्रश्न अनेक नागरिकांना पडतो. अनेकजण निवृत्तीनंतर कुटुंबासोबत वेळ घालवतात. तर काहीजण निवृत्तीनंतरही काम करणे पसंत करतात. परंतु, वाढत्या वयानुसार नोकरी मिळणे अवघड असते. विविध क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी तरूणांना पहिली पसंती दिली जात असल्याने, वृद्धांसाठी नोकरीच्या संधीही कमी असतात.
आर्थिक व इतर कारणांमुळे निवृत्तीनंतरही काहीजण पार्ट टाइम नोकरीला पसंती देतात. वृद्ध नागरिकांना कोणत्या ठिकाणी नोकरी मिळू शकते व नोकरीसाठी अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, त्याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
नोकरी शोधताना या गोष्टी ठेवा लक्षात
स्वतःवर विश्वास ठेवा | वृद्ध नागरिकांना नोकरी शोधताना स्वत:वरचा विश्वास कमी होऊ शकतो. कारण, वयस्कर नागरिकांसाठी नोकरीच्या संधी खूप कमी असतात. मात्र, अशावेळी स्वतःच्या कौशल्य, ज्ञान आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वर्ष कामाचा अनुभव असल्याने स्वतः विश्वास ठेवणे आवश्यक आहे. |
अनुभवाला प्राधान्य | वयाकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी, अनुभव म्हणून पाहणे गरजेचे आहे. तसेच, नोकरी शोधताना नियोक्त्यांना तुमच्या अनुभवाचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, हे समजून सांगा. तुमच्या रिझ्यूमेमध्ये अनुभवाचा व तुम्ही केलेल्या कामाचा उल्लेख करा. यामुळे नोकरी मिळण्यास निश्चितच मदत होईल. नेहमी लक्षात ठेवा की, वयावरून तुमची योग्यता ठरवत नाही. तर तुमच्याकडे असलेला अनेक वर्षांचा अनुभव व तुम्ही करत असलेले काम यावरून तुमची गुणवत्ता सिद्ध होत असते. |
नेटवर्किंग | मागील 25-30 वर्ष नोकरी करताना तुमची भरपूर व्यक्तींशी भेट झाली असेल. अशा ओळखींचा वापर नवीन नोकरी मिळवण्यासाठी करू शकता. याशिवाय, तुमच्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींशी ओळख निर्माण करा. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. या नेटवर्किंगचा फायदा नोकरीसाठी होऊ शकतो. |
तंत्रज्ञानाचा वापर | आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोकरी हवी असल्यास तंत्रज्ञानाचा योग्यप्रकारे वापर करता येणे आवश्यक आहे. बदलत्या ट्रेंडनुसार स्वतःला जुळवून घेतल्यास नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात. |
ज्येष्ठ नागरिकांसाठी नोकरीच्या संधी
फ्रीलान्सिंग | निवृत्ती घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिक फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतात. लेख, स्क्रिप्ट लिहिण्याचे काम तुम्ही करू शकता. याशिवाय एडिटिंग, ट्रान्सक्रिप्शन, ग्राफिक डिझाइनची कामे देखील वृद्ध नागरिक करू शकतात. |
ग्रंथपाल | ज्येष्ठ नागरिक लायब्ररीमध्ये ग्रंथपाल म्हणूनही पार्ट टाइम नोकरी करू शकतात. वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी ही नोकरी चांगली आहे. |
विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ | गेली अनेक वर्ष केलेल्या कामाचा उपयोग या नोकरीसाठी होऊ शकतो. तुम्ही इतरांना त्या क्षेत्रातील माहिती अथवा सल्ला देण्यासाठी तज्ञ म्हणून काम करू शकता. |
शिक्षक | अनेक ज्येष्ठ नागरिक शिक्षक म्हणून काम करण्यासही पसंती देतात. शिक्षण म्हणून काम करताना अनेक वर्षांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होऊ शकतो. |