जयंत वर्मा यांनी अर्थव्यवस्थेसंबंधी अनेक महत्वाच्या मुद्द्यावर मत मांडले आहे. देशाची सद्यस्थिति आणि भविष्य याबाबत काही निरीक्षणे नोंदवली आहेत.
अर्थव्यवस्थेला चालना देणारी चार इंजिने म्हणजे निर्यात, सरकारी खर्च, भांडवली गुंतवणूक आणि खाजगी वापर. यापैकी निर्यात आणि सरकारी खर्चाने महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना दिली. पण भांडवली गुंतवणूक आणि खाजगी वापर ही दोन इंजिने मंदावली आहेत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीचे सदस्य (MPC) जयंत आर वर्मा यांनी म्हटले आहे.
जयंत आर वर्मा म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. भविष्यातील विकासदर अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेला पूर्ण पाठबळाची आता गरज आहे.
गेल्या MPC बैठकीत व्याजदर वाढवण्याच्या विरोधात वर्मा यांनी मत दिले होते. त्यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले की, देशाची आर्थिक वाढ कमकुवत झालेली आहे. याचे कारण खाजगी वापर आणि भांडवली गुंतवणूक वाढलेली नाही. याशिवाय भारताला लोकसंख्याशास्त्रीय फायदा आहे. अशा परिस्थितीत तरुणांना रोजगार देण्यासाठी उच्च विकासाची गरज आहे. भारताचा विकास इतर जगाच्या तुलनेत कमी गतीने होईल असा माझा अंदाज नाही, असेही ते म्हणाले. आपल्या आकांक्षेप्रमाणे आपण विकास साधू शकणार नाही ही भीती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज 7% वरून 6.8% पर्यंत कमी केला आहे.
भारताला मंदीचा (resession ) धोका नाही
भविष्यातील वाढीची चिंता भांडवली गुंतवणूकीवर परिणाम करत आहे, असे वर्मा म्हणाले. येत्या काही महिन्यात मागणी कमी झाल्यानंतर चौथे इंजिन म्हणजेच खाजगी वापर वाढेल का हा मुख्य प्रश्न आहे. सध्या जगात मंदीचे वातावरण दिसते आहे. अनेक देश यामुळे चिंतित झाले आहेत. भारतावर याचे काय परिणाम होतील, भारतालाही या परिस्थितीतून जावे लागू शकते, अशा प्रकारची वारंवार होताना दिसते. यावरही वर्मा यांनी भाष्य केले आहे. इतर देशांप्रमाणे भारताला मंदीचा धोका नाही कारण आपण मोठ्या देशांपेक्षा चांगले काम करत आहोत, असे ते या विषयवार बोलताना म्हणाले.