धुम्रपान (Smoking) ही एक जीवघेणी सवय किंवा व्यसन आहे. काही जणांच्या बाबतीत ती मर्यादित स्वरुपाची सवय आहे, तर काही जण अशा जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जातात. यामुळे शारीरिक नुकसान तर होतंच मात्र पैशांचाही चुराडा होतो. व्यसनाधीन व्यक्ती मात्र यापैकी कशाचाही विचार करत नाही. सिगारेटचं व्यसनही आर्थिक नुकसान करणारं असल्याचं जपानच्या एका घटनेवरून समोर आलंय. सिगारेट प्यायल्यानं या व्यक्तीला 9 लाखांचा दणका बसलाय.
Table of contents [Show]
तिघांना ठोठावला दंड
जपानमधल्या ओसाका (Osaka) याठिकाणी एका सरकारी कर्मचाऱ्याला नऊ लाखांचा दंड आकारण्यात आलाय. संबंधित व्यक्ती कामाच्या वेळेत धुम्रपान करत असल्याचं आढळलं. असं कृत्य करताना पकडल्यानंतर त्याला 1.44 येन म्हणजेच अंदाजे 9 लाखांपर्यंतचा भला मोठा दंड आकारण्यात आलाय. द स्ट्रेट्स टाइम्सनं (Straits Times) याविषयीचा अहवाल दिलाय. हा सरकारी कर्मचारी त्याच्या 14 वर्षांच्या कार्यकाळात 4,500पेक्षा जास्त वेळा गैरप्रकार करत असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला. ही शिक्षा या 61 वर्षीय कर्मचाऱ्यासह त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांवरही लावण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी प्रीफेक्चरच्या वित्त विभागात काम करतात, असं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
10 टक्के वेतनात कपात
पुढच्या सहा महिन्यांसाठी 10 टक्के वेतन कपात करण्याचा आदेशही यात समाविष्ट आहे. वर्तणुकीच्या उल्लंघनासाठी आरोप लावण्याआधी कर्मचाऱ्याला अनेकवेळा इशारा देण्यात आला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तपासाला सुरुवात झाली. सप्टेंबर 2022मध्ये, मानव संसाधन विभागाला एक निनावी सूचना मिळाली होती. हे तिघे गुप्तपणे तंबाखू लपवत आहेत, त्याचप्रमाणं सिगारेट पित आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना बोलावलं आणि पुन्हा धूम्रपान करताना पकडले गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. या इशाऱ्याचा त्या तिघांवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी लपूनछपून धूम्रपान सुरूच ठेवलं.
बंदी असतानाही...
काही महिन्यांनंतर याचा पाठपुरावा करण्यात आला. संबंधित व्यक्तींच्या वर्तनाचं निरीक्षण करण्यात आलं. या तिघांना विचारणा करण्यात आली. मात्र कामाच्या वेळेत धुम्रपान करत असल्याचं कबूल करणं त्यांनी टाळलं. स्थानिक लोकसेवा कायद्यांतर्गत, संबंधित कर्मचाऱ्यानं कर्तव्यात कसूर केल्याचं हे प्रकरण गृहीत धरलं गेलं. एका अंदाजानुसार त्यांनी ड्युटीवर असताना सुमारे 355 तास 19 मिनिटं धुम्रपान केलं असल्याचं समोर आलं आहे.2008मध्ये ओसाका प्रशासनानं सार्वजनिक शाळा आणि कार्यालयं यांचा समावेश असलेल्या सरकारी आवारात धूम्रपानावर संपूर्ण बंदी आणली आहे. या व्यतिरिक्त, 2019पासून, सरकारी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
हानीकारक असूनही दुर्लक्ष
सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असल्याच्या जाहिराती थिएटर, टीव्ही, मोबाइलवर आपण नेहमी पाहतो. मात्र अनेकजण त्याच्या आहारी जातात. भारतातही याचे प्रमाण जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, भारतात जवळपास 267 दशलक्ष लोक तंबाखूचा वापर करतात. बर्याच वेळा ऑफिसमध्ये काम करताना ब्रेक म्हणून मग सिगारेटचा वापर होतो. मात्र यामुळे आरोग्याची हानी तर होतेच मात्र अशाप्रकारे आर्थिक दणकाही बसू शकतो.