Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR without Form 16: फॉर्म 16 शिवाय ITR फाईल करता येईल, 'या' स्टेप फॉलो करा

ITR

Image Source : news.cleartax.in

ITR without Form 16: वैयक्तिक करदाते ज्यांच्याजवळ फॉर्म 16 नाही अशांसाठी आयकर विभागाने टॅक्स रिटर्न फायलिंगचा पर्याय दिला आहे. असे करदाते ज्यांच्याजवळ पगाराची पावती आणि फॉर्म 26AS असेल ते रिटर्न फाईल करु शकतात.

आयकर रिटर्न फायलिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. 31 जुलै 2023 अखेर करदात्यांना रिटर्न फायलिंग करता येईल. त्यानंतर रिटर्न फाईल केल्यास त्यावर दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, रिटर्न फायलिंगसाठी फॉर्म 16 हा एक महत्वाचा दस्त आहे. खासकरुन पगारदार किंवा नोकरदारांना कंपन्यांकडून फॉर्म 16 दिला जातो. मात्र ज्यांच्याजवळ फॉर्म 16 नाही अशांना देखील रिटर्न फाईल करता येऊ शकतो.

नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या फॉर्म 16 मध्ये वेतनाचा तपशिल, टीडीएस किती वजा केलेला आहे याविषयीची माहितीचा उल्लेख असतो. त्याशिवाय फॉर्म 16 मध्ये संबधित नोकरदाराने केलेल्या गुंतवणुकीचा उल्लेख असतो. मात्र ज्यांच्याजवळ फॉर्म 16 नाही असे नोकरदार सॅलरी स्लीप आणि फॉर्म 26AS च्या सहाय्याने टॅक्स रिटर्न फाईल करु शकतात.

वैयक्तिक करदाते ज्यांच्याजवळ फॉर्म 16 नाही अशांसाठी आयकर विभागाने टॅक्स रिटर्न फायलिंगचा पर्याय दिला आहे. असे करदाते ज्यांच्याजवळ पगाराची पावती आणि फॉर्म 26AS असेल ते रिटर्न फाईल करु शकतात.  

फॉर्म 16 शिवाय ITR फाईल कसा करायचे ते समजून घेऊया.

- तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला कंपनीने फॉर्म 16 दिला नसेल तर काही हरकत नाही सॅलरी स्लीपच्या सहाय्याने तुम्हाला रिटर्न फाईल करता येईल.

- कंपनीकडून आर्थिक वर्षातील सर्वच महिन्यांच्या सॅलरी स्लीप तुम्ही गोळा करा. या सॅलरी स्लीपमध्ये तुमचा मूळ पगार, भत्ते, इतर सुविधा, बोनस याची नोंद असेल.

- सर्व 12 महिन्यांच्या सॅलरी स्लीपच्या आधारे करपात्र उत्पन्न किती असेल याची गणना करा.

- करपात्र उत्पन्नात मूळ पगार, प्रवास भत्ता, बोनस आणि इतर भत्ते यांचा समावेश होते.

- एकूण करपात्र उत्पन्नाचे कॅलक्युलेशन झाले की त्यातून घरभाडे भत्ता, स्टॅंडर्ड डिडक्शन, प्रोफेशनल टॅक्स ही रक्कम वजा करावी लागेल. यानंतर तुम्हाला नेमके किती करपात्र उत्पन्न आहे हे समजेल.

- सॅलरी स्लीप आणि फॉर्म 26AS जितके महत्वाचे आहेत तितकेच तुमचे बॅंक स्टेटमेंट देखील आयटीआर फायलिंगसाठी महत्वाचे ठरतात. बँक खात्यांमधून इतर उत्पन्नाबाबतची माहिती उपलब्ध होते.

- करपात्र उत्पन्नाची जुळवाजुळव करताना बँक खात्यात जमा झालेले डिव्हीडंड इन्कम, ठेवींवरील व्याजाची रक्कम हे ग्राह्य धरावे.

- करदात्याने ज्या ज्या बँकांमध्ये खाते असेल किंवा एफडी असेल असा सर्व तपशील एकत्र करुन त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा लेखाजोखा देणे आवश्यक आहे. करपात्र उत्पन्नाची गणना करण्यापूर्वी व्याजाचे उत्पन्न, लाभांश यांचाही समावेश करावा.

- टॅक्सेबल इन्कमची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आयकर विभागाच्या वेबसाईटवर करदात्याला फॉर्म 26ASची छाननी करता येईल. प्रत्येक पॅनकार्डधारकाचा फॉर्म 26AS आयकर विभागाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. हे एक प्रकारचे अकाउंट स्टेटमेंट आहे. ज्यात सर्व कर वजावटी आणि ठेवींचा उल्लेख असतो.

- जर तुम्हाला मिळालेल्या उत्पन्नात कुठे टीडीएसची वजावट झाली असेल तर त्याची योग्य माहिती सादर करणे आवश्यक आहे. ही माहिती  तुमच्या करपात्र उत्पन्नात सादर केलेल्या माहितीशी तंतोतंत जुळणारी असावी. त्यात काही तफावत असल्यास रिटर्न फायलिंगवेळी अडचण येऊ शकते.