इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आज 18 जुलै 2023 पर्यंत रिटर्न फायलिंगने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ऑनलाईन प्रोसेस असल्याने रिटर्न फायलिंग गतिमान झाले आहे. ITR साठी आणखी 12 दिवस शिल्लक आहेत.
येत्या 31 जुलै 2023 पर्यंत वैयक्तिक करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्काला भुर्दंड सोसावा लागेल.
आतापर्यंत झालेल्या इन्कम टॅक्स रिटर्नची आकडेवारी आयकर विभागाने ट्विट करुन जाहीर केली. असेसमेंट वर्ष 2023-24 साठी 18 जुलै 2023 अखेर 3 कोटींहून अधिक ITR फाईल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 25 जुलै रोजी 3 कोटी आयटीआर फायलिंगची प्रोसेस पूर्ण झाली होती.
आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार 3.06 कोटी रिटर्न फाईल झाले असून त्यापैकी 2.81 कोटी आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन झाले आहे. आणखी 1.50 कोटी आयटीआर फायलिंग प्रोसेसमध्ये असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.
करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर फाईल करण्याचे आवाहन करदात्यांना केले आहे. शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी वेळेत रिटर्न फाईल करावा असे आवाहन इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात येत आहे.
नुकताच महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनीआयकर विवरणासाठी मुदत वाढवून मिळणार नाही, असे स्पष्ट केले होते. 31 जुलै 2023 ही इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी अंतिम मुदत आहे. त्यानंतर रिटर्न फायलिंग करणाऱ्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे.