ITR Filing Last Date 2023: ज्या वैयक्तिक करदात्यांना आपल्या बँकेचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही; अशा करदात्यांसाठी 31 जुलै, 2023 ही ITR भरण्याची अंतिम मुदत आहे. तरीही एका सर्व्हेनुसार अजून 27 टक्के लोकांनी ITR भरलेला नाही. त्यातील 14 टक्के लोक 31 जुलैपर्यंत ITR भरू शकणार नाहीत, असेही सर्व्हेमधून दिसून आले आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 5 कोटी करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे; तर त्यातील 4.46 कोटी करदात्यांचे ITR व्हेरिफाय देखील झाले आहे. म्हणजे साधारण 73 टक्के लोकांनी आतापर्यंत आयटीआर भरले आहे. तर उर्वरित 27 टक्के करदात्यांना अजून आयटीआर भरायचा आहे. यातील जवळपास 14 टक्के करदाते असे आहेत. जे 31 जुलैपर्यंत आयटीआर भरू शकणार नाहीत, असे LocalCirclesने केलेल्या सर्व्हेमधून दिसून आले आहे.
दिल्लीतील LocalCircles या संस्थेने आयटीआर संदर्भात नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये भारतातील 315 जिल्ह्यांमधून 12,000 लोकांची माहिती गोळा करण्यात आली. त्यातील 41 टक्के लोक हे महानगरांमधील होते. तर 32 टक्के 2 टिअर आणि 27 टक्के 3-4 टिअर शहरातील आणि ग्रामीण भागातील होते.
आयटीआर भरण्यात अडचणी
अनेक जणांना स्वत:हून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे बरेच जण ती प्रक्रिया अर्धवट सोडून देत आहेत. काहींना त्यातील विविध सेक्शनचा लाभ कसा घ्यायचा किंवा आपण भरत असलेली माहिती योग्य आहे की नाही. याविषयी खात्र नसल्यामुळे ते अर्धवट राहत आहेत. तर काही जणांच्या वार्षिक विवरण पत्रात योग्य माहिती दिली नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळेही काही लोकांनी अजून आयटीआर भरलेला नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहणाऱ्यांची संख्या मोठी
आपल्याकडे काही करदाते असे आहेत. जे 31 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत आयटीआर भरू शकतो, या आत्मविश्वासात असतात. पण यातील काही जणांची शेवटच्या क्षणाला तारांबळ उडते. पुरेसे आणि योग्य कागदपत्रांची जुळवाजुळव न केल्याने आहे तसा फॉर्म भरून जमा करावा लागतो. यामुळे काहीवेळेस आर्थिक नुकसानही सोसावे लागते.