इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी आज शेवटचा दिवस आहे. आज 31 जुलै 2023 रोजी संध्याकाळपर्यंत 6.5 कोटी रिटर्न फायलिंग पूर्ण झाले आहेत. ऑनलाईन फायलिंगमुळे आयकर विभागाच्या वेबसाईटवर ट्रॅफिक वाढले आहे. तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न फायलिंगसाठी मुदत वाढ देण्याची मागणी सोशल मीडियावरुन करण्यात येत आहे.
आयकर विभागाकडून मुदतवाढीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटचा दिवस असल्याने रिटर्न फायलिंगसाठी नोकरदार वर्गाची धावपळ सुरु आहे. मागील आठवडाभर चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात देखील आयटीआर फायलिंगची कामे प्राधान्याने सुरु होती.
दरम्यान, मागील दोन आठवडे झालेला पाऊस, काही राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती अशा कारणांमुळे अनेकांना रिटर्न फाईल करता आला नाही. त्याचबरोबर आज शेवटच्या दिवशी रिटर्न फायलिंगसाठी वेबपोर्टलवर एकच गर्दी झाल्याने आयकर विभागाची वेबसाईट स्लो झाली आहे. यामुळे इन्कम टॅक्स रिटर्नसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करदात्यांनी केली आहे.
आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 6.50 कोटी रिटर्न फाईल झाले आहेत. त्यातील 36 लाख 91 हजार आयटीआर आज शेवटच्या दिवशी फाईल झाले आहेत.
नोकरदार वर्गाला इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी फॉर्म 16, टीडीएस सर्टिफिकेट, बँक स्टेटमेंट, गुंतवणूक संबधी कागदपत्रे, भाडे करार, देणगी पावत्या अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. या कागदपत्रांच्या आधारे नोकरदार वर्गाला आयकर विभागाच्या वेबसाईटवरुन थेट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येईल.
आज आयकर विभागाने रिटर्न फायलिंगसाठी मुदतवाढ दिली नाही तर 1 ऑगस्ट 2023 पासून रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. ज्यांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल अशा करदात्यांना रिटर्न फायलिंग करताना 5000 रुपयांचा दंड भरावा लागेल. 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना 1000 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.