पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारतामध्ये संपूर्ण डिजिटल व्यवहार ही सुद्धा एक कल्पना आहे. त्यासाठी आवश्यक योजना, सेवा सरकारी पातळीवर वेळोवेळी पुरवण्यात येत आहेत. तरीही 100% डिजिटल व्यवहार सध्या तरी शक्य आहेत का? असा प्रश्न सध्याची परिस्थिती बघताना पडतो.
आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पण आजही ऑनलाईन व्यवहारांबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता नसल्याने 100% व्यवहार ऑनलाईन होत नसल्याचे चित्र आहे. डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना, तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. उदाहरणार्थ, लोकलचे किंवा दुरच्या प्रवासाचे आरक्षित तिकीट काढायचे असल्यास आपल्याकडे आयआरसीटीसी, यूटीएस सारखे पर्याय उपलब्ध असताना आजही तिकीटांसाठी तिकीट खिडक्यांच्या बाहेर मोठी रांग दिसते.
भिती तसेच अज्ञान मोबाईलचा स्मार्ट वापर न करण्यास कारणीभूत – दुकानदार, व्यावसायिक
स्मार्टफोन हातात आहेत. पण त्याचा हवा तसा उपयोग, वापर अनेकांना करता येत नाही. एवढेच काय तर अनेकांना मोबाईलसाठी कोणता रिचार्ज प्लॅन घ्यावा हे सुद्धा माहीत नसते. अशावेळी मोबाईल रिचार्ज, बिल भरणा सारख्या सेवा देणाऱ्या दुकानांबाहेर आपल्याला नागरिकांची गर्दी दिसते. ऑनलाईन व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये असलेली भिती तसेच अज्ञान मोबाईलचा स्मार्ट वापर न करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत दुकानदार आणि ही सेवा पुरवणारे व्यावसायिक मांडतात. आज पेटीएम (Paytm), गुगल पे (google pay), फोन पे (Phone pay) सारखे प्लॅटफॉर्म ऑनलाईन व्यवहारांसाठी उपलब्ध असतानाही मनी ट्रान्झॅक्शन, बील भरणा, रिचार्ज भरणा करण्यासाठी या सेवा पुरवणाऱ्या दुकानांबाहेर लोकांना रांग लावावी लागत आहे.
सरकारच्या पुढाकाराची गरज
आज प्रत्येक दुकानदार असो की लहान-मोठा वस्तू, सेवा विक्रेता प्रत्येकाकडे गुगल पे, फोन पे ने व्यवहाराची सुविधा असतेच. मात्र तरीही रोकडीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त आढळते, असे मत व्यावसायिक नोंदवतात. सरकारने पुढाकार घेऊन डिजिटल व्यवहारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले तर मोठ्या संख्येने वयोवृद्धही डिजिटल व्यवहारांचा पर्याय निवडतील.
आमचा स्टेशनरीचा लहानसा व्यवसाय आहे. यासोबतच आम्ही मोबाईल रिचार्ज, रेल्वे तिकीट, विविध बिलं भरणे यासारख्या सेवा सुद्धा पुरवतो. आज जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. पण त्याचा योग्य तो वापर प्रत्येकाला करता येतोच असे नाही. त्यामुळे सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध असूनही तिकीट काढणे, विविध बिलं भरणे यासाठी आमच्याकडे नेहमीच लोकांची गर्दी दिसते. स्टेशनरी ही आमच्या व्यवसायाचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. आमच्या येथे जवळपास कुठेही डिजिटल व्यवहार देणारी केंद्रे नाहीत. तसेच कोणतेही अन्य दुकानदार ही सेवा पुरवत नाहीत. केवळ लोकाग्रहास्तव आम्ही स्टेशनरी सोबत इतर डिजिटल सेवा देण्यास सुरुवात केली आहे. PayNearBy, mBnk, mSwift सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करुन आम्ही डिजिटल सेवा पुरवत आहोत. यामधून मिळणारी मिळकत समाधानकारक नसली तरी लोकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्यांची सेवा यामुळे आम्ही डिजिटल सेवा देण्याची सुविधा पुढेही सुरुच ठेवणार आहोत.
प्रभाकर कोकरे, व्यावसायिक, श्री स्वामी समर्थ स्टेशनरी, डोंबिवली