Health Insurance: विमा कागदपत्रांवरील मजकूर सहसा तांत्रिक, कायदेशीर भाषेत लिहलेला असतो. सर्वसामान्य नागरिकांना पॉलिसीमध्ये नक्की काय लिहले आहे, हे समजत नाही. त्यावर इर्डाने आता एक नवा प्रस्ताव आणला आहे. त्यानुसार सर्व विमा कंपन्यांना विमा पॉलिसीची कागदपत्रे सोप्या, सुटसुटीत आणि एकसमान पद्धतीने लिहावे लागतील. पॉलिसी ग्राहकाला सहज समजावी, हा उद्देश यामागे आहे.
सध्या प्रत्येक विमा कंपनीची पॉलिसी डॉक्युमेंट वेगवेगळ्या पद्धतीने लिहलेली असतात. तांत्रिक आणि कायदेशीर भाषेमुळे फक्त आपल्याकडे विमा पॉलिसी आहे एवढंच काही ग्राहकांना समजते. मात्र, पॉलिसीतील बारकावे लक्षात येत नाही. (Health Insurance Document) यातून बऱ्याच वेळा चुकीची पॉलिसी किंवा फसवणूक होण्याची शक्यताही असते. इन्शुरन्स नियामक संस्थेने पॉलिसीधारकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर सध्या विचार विनिमय सुरू आहे.
सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार
विविध विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीची कागदपत्रे आठ-दहा पानांपेक्षा मोठी असतात. कोणत्या पानावर काय लिहलं आहे, हे लक्षात येत नाही. (Health Insurance policy doc) नव्या प्रस्तावानुसार पॉलिसीमधील महत्त्वाच्या गोष्टी एकाच ठिकाणी दिल्या जातील. तसेच पॉलिसी कालावधी, फ्री लूक पिरियड, विम्याची रक्कम, फायदे सोप्या भाषेत ग्राहकाला समजून सांगावे लागतील.
कस्टमर इन्फॉर्मेशन शीट
पॉलिसी धारकाच्या हक्कांचा समावेशही यामध्ये करण्यात येईल. यास कस्टमर इन्फॉर्मेशन शीट (CIS) असे म्हटले आहे. ही डॉक्युमेंट पॉलिसीधारकाला विमा खरेदी करतेवेळी तसेच रिन्यू करते वेळी कंपनीला द्यावे लागेल. तसेच सर्व विमा कंपन्या एकच फॉरमॅट वापरतील, असे प्रस्तावात म्हटले आहे.
नव्या प्रस्तावातून ग्राहकांचा फायदा काय?
आरोग्य विमा पॉलिसीची माहिती ग्राहकांना एकाच ठिकाणी सोप्या भाषेत मिळेल.
फ्री-लूक-अप पिरियडची माहिती समाविष्ट करावी लागेल. म्हणजेच पॉलिसी योग्य वाटली नाही तर किती दिवसात माघारी करता येईल, किंवा पॉलिसीत बदल करता येईल ती तारीख यावर असेल.
विम्याचा दावा पास होण्यास किती कालावधी लागू शकतो, हे कंपन्यांना नमूद करावे लागेल.
वेटिंग पिरियड, वगळण्यात येणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा लागेल.
पॉलिसीचे फिचर्स सोप्या शब्दांत लिहण्यात येतील.
काही वाद उद्भवल्यास कोणाकडे दाद मागता येईल याची माहितीही द्यावी लागेल.