भारतीय रेल्वेने आयआरसीटीसी (IRCTC) द्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंगची कमाल संख्या वाढवली आहे. रेल्वेच्या निर्णयानंतर आधार कार्ड लिंक (Aadhar Card Link) नसलेल्या प्रवाशांनाही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करता येणार आहेत. तर आधार लिंक असलेल्या प्रवाशांना एका महिन्यात जास्तीत-जास्त 24 तिकिटे बुक करता येणार आहेत.
एका महिन्यात 24 तिकीटं मिळणार
आधारकार्ड लिंक नसलेल्या प्रवाशांना या निर्णयाआधी एका महिन्यात फक्त 6 तिकिटे बुक करता येत होती. या निर्णयानंतर 6 तिकिटांची मर्यादा 12 तिकिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर आधार लिंक असलेल्या युजर आयडीद्वारे एका महिन्यात 12 तिकिटांची मर्यादा 24 तिकिटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तिकिटांची मर्यादा वाढविल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच आयआरसीटिसी (IRCTC) ने तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत थोडा बदल केला आहे.
तिकीट बुक करताना संपूर्ण पत्त्याची गरज नाही
रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना तिकीट काढताना त्यांच्या पोहोचण्याच्या ठिकाणची व त्या ठिकाणच्या पत्त्याची संपूर्ण माहिती देणे बंधनकार नाही. कोरोना काळात रुग्णांना ट्रेस करण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी बुकिंग करताना प्रवाशांना पत्ता भरण्यासाठी दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत होता. आता तो वेळही वाचणार असून, यामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंग लवकर होणार आहे. तात्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयाने प्रवाशांना एका युजर आयडीने जास्तीतजास्त तिकीट बुक करता येणार आहेत. तसेच पूर्ण पत्ता भरण्यासाठी लागणार वेळी वाचणार आहे. यामुळे हे दोन्ही नियम प्रवाशांसाठी फायदेशीर आहेत