Indian railway: भारतातील ट्रेनमध्ये अगदी गरीब व्यक्तींपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच प्रवास करु शकतात. तुम्ही खर्च केलेल्या रकमेनुसार ट्रेनचा डब्बा तुमच्यासाठी उपलब्ध असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, देशात अशाही काही ट्रेन आहेत, ज्यामध्ये प्रवास करण्यापूर्वी श्रीमंत व्यक्ती देखील दोनदा विचार करतात. आज आपण भारतात धावणाऱ्या अशा काही ट्रेन बाबत माहिती करुन घेणार आहोत, ज्यांचे एका व्यक्तीचे भाडे हे लाखोंच्या घरात आहे.
Table of contents [Show]
महाराजा एक्सप्रेस
भारतातील सगळ्यात महागड्या ट्रेन बाबत बोलायचे झाल्यास, महाराजा एक्सप्रेस होय. ही ट्रेन आशियातील सर्वात लक्झरी ट्रेन म्हणून ओळखली जाते. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला एका व्यक्तीकरीता 20 लाख रुपये खर्च करावे लागतील. ही ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे चालवली जाते. ट्रेनमधील प्रवाशांचे राजे-सम्राटांप्रमाणे स्वागत केले जाते. ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी सर्व आलिशान सुविधा आहेत. म्हणजेच या ट्रेनचे तिकीट भाडे जेवढे आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही लहान शहरात फ्लॅट खरेदी करू शकता. ताजमहाल, खजुराहो मंदिर, रणथंबोर, फतेहपूर सिक्री आणि वाराणसी मार्गे देशातील प्रमुख पर्यटन स्थळांवर नेणारी ही ट्रेन 7 दिवसात आपला प्रवास पूर्ण करते.
रॉयल राजस्थान ऑन व्हील्स
पॅलेस ऑन व्हील्सच्या यशानंतर भारतीय रेल्वेने रॉयल राजस्थान ऑन व्हील्स सुरू केले. ही ट्रेन 2009 मध्ये सुरू झाली. या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा संपूर्ण टूर प्लान 7 दिवस 8 रात्रीचा आहे. रॉयल राजस्थान ऑन व्हील्सच्या डिलक्स केबिनचे भाडे 3,63,300 रुपये आहे.
पॅलेस ऑन व्हील्स
पॅलेस ऑन व्हील्स ही भारतातील दुसरी सर्वात महागडी ट्रेन आहे. ही ट्रेन राजस्थानच्या शाही शैलीत सजवण्यात आली आहे. या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा राजा-महाराजांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात येते. दिल्लीपासून सुरू होणारी ही ट्रेन राजस्थानातील विविध किल्ले आणि राजवाड्यांचा फेरफटका मारते. ही ट्रेन जयपूर, सवाई माधोपूर, चित्तोडगड, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, भरतपूर आणि आग्रा मार्गे दिल्लीला परतते. पॅलेस ऑन व्हील्सच्या एका तिकिटाचे भाडे 3 लाख 63 हजार 300 रुपये आहे.
डेक्कन ओडिसी
डेक्कन ओडिसीची सुरुवात मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी करण्यात आली. ही ट्रेन प्रवाशांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, औरंगाबाद, अजिंठा-एलोरा नाशिक, पुणे यासह 10 पर्यटन स्थळे दाखवते. या ट्रेनच्या डिलक्स केबिनचे भाडे 8,330 डॉलर आणि प्रेसिडेंशियल सूटचे भाडे 17,850 डॉलर आहे.
सुवर्ण रथ
गोल्डन रथ ट्रेन पर्यटकांना दक्षिण भारताचे सौंदर्य दाखवते. भारतीय रेल्वेची ही ट्रेन प्रवाशांना राजा-रजवाड्यात राहत असल्याचे भासवते. ही ट्रेन तुम्हाला कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमधील सर्व खास ठिकाणांवरून घेऊन जाते. या संपूर्ण ट्रेनचे सर्वात कमी भाडे 1 लाख 82 हजार रुपये आहे.