Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे आयपीओ कंपन्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’

शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे आयपीओ कंपन्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’

सेबीने आतापर्यंत 67 कंपन्यांना आपला आयपीओ (Initially Pubic Offer-IPO) लॉण्च करण्याची परवानगी दिली आहे. पण यातील फक्त 16 कंपन्यांनी आतापर्यंत आपला आयपीओ लॉण्च केला आहे.

भांडवली बाजार नियंत्रक म्हणजेच सेबीने यावर्षभरासाठी 67 कंपन्यांना आपला आयपीओ (Initially Pubic Offer-IPO) लॉण्च करण्याची परवानगी दिली. पण यातील आतापर्यंत फक्त 16 कंपन्यांनी यावर्षी आयपीओ लॉण्च केला आहे. या तुलनेत गेल्या वर्षी आतापर्यंत 24 कंपन्यांनी आपला आयपीओ लॉण्च (IPO Launch) केला होता.

तज्ज्ञांच्या मते, शेअर मार्केटमधील अस्थिरता, रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेला तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून वाढवण्यात आलेला रेपो दर (Repo Rate) आणि अमेरिकेमध्ये आलेलं मंदीचं वातावरण यासारख्या कारणांमुळे आयपीओसाठी नोंदणी केलेल्या कंपन्यांनी अद्याप आपला आयपीओ लॉण्च केलेला नाही.

आनंद राठी शेअर्स आणि स्टॉक ब्रोकर्समधील इक्विटी रिसर्चचे मुख्य नरेंद्र सोळंकी यांनी याबाबत सांगितले की, कंपन्या सध्या जोखीम घेण्यास तयार नाही. सध्याची मार्केटची स्थिती खूप चांगली नाही. त्यामुळे यावर्षी आयपीओची संख्या कमी झाली आहे. यामागचं नेमकं कारण हे ग्लोबल आहे. वाढते व्याजदर आणि महागाईचा आलेख कित्येक दिवसांपासून खाली येत नसल्यामुळे विकिसत देशांमध्ये मंदीचे वातावरण तयार झाले आहे.

सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी 50 (Nifty 50) या दोन्ही निर्देशांकामध्ये आतापर्यंत 9 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या दोन्ही निर्देशांकांनी सुमारे 22 ते 24 टक्के परतावा दिला होता. बेंचमार्क इंडेक्समध्येही आतापर्यंत 15 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. इंडेक्स हा 200 दिवसांच्या मूव्हिंग अव्हरेजपेक्षा (निफ्टीसाठी 17,152) खाली आहे.

सेबीने आतापर्यंत 67 कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी परवानगी दिली आहे. याशिवाय 38 कंपन्यांनी आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे; आणि ते परवानगी मिळण्याची वाट पाहत आहेत. यामध्ये स्नॅपडील, ड्रूम टेक्नॉलॉजी, ओयो, अलाईड ब्लेंडर्स ॲण्ड डिस्टिलर्स, नवी टेक्नॉलॉजीज, एबिक्सकॅश, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस, पेमेंट इंडिया, बीबा फॅशन, केफिन टेक्नॉलॉजी, हेमानी इंडस्ट्रीज, जॉयलुकास इंडिया, यात्रा ऑनलाईन, विक्रम सोलर आणि लावा इंटरनॅशनल या कंपन्यांचा समावेश आहे.