2022 मध्ये आयपीएल (IPL) या देशातल्या सगळ्यात मोठ्या स्पोर्ट्स ब्रँडने (Sporting Brand) 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेतली आहे. हे मूल्य आयपीएलचं (IPL Value)एकूण उलाढालीचं आहे. 2020 पासून या मूल्यांकनात कायम वाढच झाली आहे. आणि 2020 मध्ये 6 अब्ज अमेरिकन डॉलरवर असलेल्या मूल्यात आता 4 अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे.
बियाँड 22 यार्ड्स या मार्केटिंग अहवालात आयपीएल विषयी आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या नवीन टीम आल्यावर स्पर्धा आणखी मोठी झाली आहे. नवीन स्टार खेळाडू आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. तसंच कोव्हिडच्या काळात घरी बसून या स्पर्धेची मजा लुटणाऱ्या प्रेक्षकांमध्येही वाढ झाली. आणि याचा परिणाम 10 अब्ज अमेरिकन डॉलरच्या उलाढालीत झाला आहे.
कारण, 10 अब्जांपैकी 6 अब्ज अमेरिकन डॉलर तर जगभरात विकलेल्या मीडिया राईट्समधून बीसीसीआयने कमावले आहेत.
‘आयपीएलचं मूल्यांकन सातत्याने 12 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात होतं. पण, दरवेळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यावर 10-12% नी मूल्यांकन कमी व्हायचं. पण, यावेळी तसं झालं नाही. डॉलर आणि रुपयातला फरक गृहित धरुनही आयपीएलचं मूल्यांकन 10 अब्जांच्या घरात गेलं,’ असं हा अहवाल सादर करणाऱ्या D & P कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक N संतोष यांनी सांगितलं.
2022 मध्ये झालेला दुसरा फायदा म्हणजे मीडिया राईट्स डिजिटल आणि टीव्हीसाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांना दिले गेले. एकाच कंपनीला राईट्स न दिल्यामुळे त्याचं मूल्य आपोआप वाढलं. डिस्ने हॉटस्टारकडे आयपीएलचे डिजिटल राईट्स होते. तर व्हायकॉम 18 कडे टीव्ही राईट्स होते.
आणखी एक गोष्ट आयपीएलच्या बाजूने घडली. ती म्हणजे दोन टीम वाढल्यामुळे सामन्यांची संख्या वाढली. पण, खेळाची लोकप्रियता कमी झाली नाही. त्यामुळे जास्त सामन्यांसाठी जास्त पैसे मीडिया राईट्स मधून मिळाले.
आगामी काळात मूल्यांकन किती असेल याचा अंदाज मात्र या अहवालात व्यक्त करण्यात आलेला नाही.