उत्पन्न वृद्धीसाठी इक्विटीचा पर्याय असून स्थिर उत्पन्नासाठी डेब्ट पर्यायाला पसंती दिली जाते.या दोघांचे मिश्रण असलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सेफ्टी, लिक्विडीटी आणि रिटर्न (Safety, Liquidity, Return) या तीन घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, असा सल्ला एलआयसी म्युच्युअल फंडांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मर्झबन इराणी यांनी दिला.
सर्वसाधारणपणे शेअर्समधील गुंतवणुकीतून चक्रवाढ परतावा मिळतो असे मागील काही वर्षांतील आकडेवारीतून दिसून येते. मात्र शेअर बाजारात जोखीम देखील प्रचंड आहे. त्यामुळे नवख्या गुंतवणूकदारांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तेथील जोखमीचा विचार करायला हवा, असे मत इराणी यांनी व्यक्त केले. कोणत्याही फंडांत गुंतवणूक करण्यापूर्वी तेथील सुरक्षितता, तरलता आणि परताव्याचे प्रमाण या महत्वाचा घटकांचा विचार करायला हवा. यामुळे गुंतवणूक जोखीम मर्यादित राहते आणि स्थिर परतावा सुनिश्चित होतो, असे त्यांनी सांगितले.
एलआयसी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने सेफ्टी, लिक्विडीटी आणि रिटर्न या फॉर्म्युल्याचा विचार करुनच नवीन फंड तयार करण्याची पद्धत मागील काही वर्षांपासून लागू केली असल्याची माहिती इराणी यांनी दिली. ते म्हणाले की, एलआयसी म्युच्युअल फंडाची एकूण एयूएम 26000 कोटी इतकी आहे. त्यापैकी 10000 कोटी इक्विटी फंडांतील गुंतवणूक आहे.
फिक्स्ड इन्कममधील परताव्याचा विचार केला तर शॉर्ट टर्ममध्ये 6.75% ते 7% आणि लॉंग टर्ममध्ये 7.5% ते 7.75% रिटर्न मिळू शकतो, असा अंदाज इराणी यांनी व्यक्त केला. किरकोळ गुंतवणूकदारांनी लिक्विड फंड, बँकिंग पीएसयू फंड, गव्हर्मेंट सिक्युरिटीज ईटीएफ अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
फिक्स्ड इन्कम श्रेणीतील पर्यायांमधून गुंतवणूकदारांना स्थिर परतावा मिळतो. इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत फिक्स्ड इन्कम कमी जोखमीचा ठरतो. त्यामुळे जोखीमशिवाय उत्पन्नाची अपेक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांना फिक्स्ड इन्कम चांगला पर्याय असल्याचे इराणी यांनी सांगितले.
मागील काही वर्षांत म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक ओघ प्रचंड वाढला आहे. पुढे हा ट्रेंड कायम राहणार असल्याने एलआयसी म्युच्युअल फंडांने द्वितीय आणि तृतीय स्तरातील शहरे आणि निमशहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या तीन वर्षांत म्युच्युअल फंडांकडील एयूएम 1 लाख कोटींपार जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सप्टेंबर 2023 अखेर म्युच्युअल फंडांकडील एकूण मालमत्ता 46 लाख कोटी इतकी आहे.
‘एलआयसी’ एजंट्स बनणार म्युच्युअल फंड वितरक
‘एलआयसी’कडील लाखो एजंट्सला म्युच्युअल फंड वितरक बनवून फंड व्यवसायाला चालना देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे, असे मर्झबन इराणी यांनी सांगितले. एलआयसीने सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेत गुंतवणूक केली आहे. आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून एलआयसी विमा आणि म्युच्युअल फंड उत्पादनांची विक्री करते.
सार्वत्रिक निवडणूक ठरवणार इंडेक्सची पुढची दिशा
- पुढल्या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.
- मागील सलग दोन टर्म केंद्रात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आहे.
- सलग दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. या काळात अर्थव्यवस्थेची पाळेमुळे आणखी मजबूत झाली.
- जगभर भारताची प्रतिमा उजळली. याचा फायदा भारतीय शेअर बाजारांना झाला. बीएसई आणि एनएसई यांनी विक्रमी झेप घेतली.
- सेन्सेक्स 100000 अंकांचा टप्पा गाठणार, असे भाकीत मागील वर्षभरापासून विविध ब्रोकर्स आणि बड्या संस्थांनी केले आहे.
- सेन्सेक्स, निफ्टीची दिशा लोकसभेचे निकाल ठरवतील, असे मत एलआयसी एएमसीचे इक्विटी हेड योगेश पाटील यांनी व्यक्त केले.
- पाटील म्हणाले की, दीड वर्षाचा विचार केला तर दोन्ही इंडेक्स आगेकूच करतील.
- मार्च 2025 अखेर बेंचमार्क सेन्सेक्स 85000 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22500 अंकांपर्यंत मजल मारेल.