शेअर मार्केटमधील तेजीने म्युच्युअल फंडांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. मार्च महिन्यात इक्विटीशीसंबधित म्युच्युअल फंड योजनांमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक गुंतवणूक झाली आहे. मार्च 2023 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात एकूण 20530 कोटींची गुंतवणूक झाली. यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून तब्बल 14000 कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत एसआयपीने होणारी गुंतवणूक 32% ने वाढली आहे. मार्च 2022 मध्ये एसआयपीतील गुंतवणूक 15567 कोटी इतकी गुंतवणूक झाली होती. इक्विटीतील जवळपास सर्वच योजनांमध्ये समाधानकारक गुंतवणूक झाल्याचे आकडे सांगतात. मात्र मल्टिकॅप फंड्स, लार्जकॅप फंडातील गुंतवणुकीचा ओघ काही प्रमाणात कमी झाला आहे.मागील एक वर्षात लार्जकॅप फंडांना अल्फा तयार करण्यात अपयश आले. बेंचमार्कच्या तुलनेत या फंडांची कामगिरी सुमार राहिल्याने गुंतवणूकदारांनी या फंडांपासून लांब राहणेच पसंत केले. एस अॅंड पी व डाउजोन्स इंडायसेसच्या अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये भारतातील जनळपास 88% लार्जकॅप फंडांची कामगिरी सुमार राहिली.
मार्च महिन्यात लार्ज कॅप फंडांना एसआयपीमधून केवळ 911 कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली. याच महिन्यात थिमॅटिक आणि सेक्टोरिअल फंडांमध्ये मात्र 3928 कोटींची गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर डिव्हीडंड देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.डिव्हीडंड यिल्ड म्युच्युअल फंडामध्ये मार्च महिन्यात 3715 कोटींची गुंतवणूक झाली आहे.
मार्चपूर्वी शेअर मार्केटमध्ये अस्थिरता असल्याने त्याचा फटका म्युच्युअल फंड गुंतवणुकीला बसला होता. नोव्हेंबर महिन्यात एसआयपी गुंतवणुकीचा ओघ 2250 कोटी इतका खाली आला होता.मात्र त्यानंतर त्यात वाढ होत गेली.मार्च महिन्यात एसआयपीमधून 14000 कोटींची गुंतणूक झाली. एका महिन्यात एसआयपीमधून होणारी ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. फेब्रुवारी महिन्यात 13686 कोटींची गुंतवणूक झाली होती.
डेब्ट आणि लिक्विड फंडांमधून गुंतवणूक काढण्याचा सपाटा
मार्च महिन्यात डेब्ट आणि लिक्विड श्रेणीतील म्युच्युअल फंडांमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. डेब्ट फंडातून तब्बल 56884 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले. लिक्विड फंडांनी 56924 कोटींची गुंतवणूक काढून घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सरकारने डेब्ट म्युच्युअल फंडांवरील दिर्घकालीन भांडवली कर सवलत रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या श्रेणीत पैसे काढून घेण्याचा ओघ वाढल्याचे जाणकारांनी सांगितले.