Fixed Deposit Interest Rate: मागील वर्षभरापासून महागाई काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया सातत्याने रेपो दरात वाढ करत आहे. परिणामी सर्व प्रकारची कर्जे महागली आहेत. त्यात लोकांनी जास्तीतजास्त पैसे बॅंकेत ठेवावेत. यासाठी बॅंकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. आज आपण अशाच काही बॅंकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या बॅंका मुदत ठेवींवर साधारण 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. बॅंका हा व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या बॅंका 9 टक्क्यांपेक्षा अधिक देत आहेत.
Table of contents [Show]
श्रीराम फायनान्स बॅंक सध्या सर्वसाधारण ग्राहकांना मुदत ठेवींवर 9.10 टक्के व्याज देत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरीकांना बॅंक 0.50 टक्के तर महिलांना 0.10 टक्के अधिक व्याज देत आहे. मुदत ठेवीचा कालावधी जसा वाढत जाईल. तसेच बॅंक व्याजदरातही वाढ करत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (FSFB)
Fincare Bank ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 9.1 टक्के व्याजदर देत आहे. तर सर्वसाधारण ग्राहकांना बॅंक 8.41 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन व्याजदर 1000 दिवसांच्या एफडी करीताच लागू आहे. बँक गुंतवणूकदारांना चक्क 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी करण्याची सोय उपलब्ध करून देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB)
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9.50 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. ही बँक केवळ 1001 दिवसांच्या एफडीवरच एवढे व्याज देते. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांसाठी या बँकेत पैसे गुंतविणे फायद्याचे ठरु शकते.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (USFB)
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 700 दिवसांच्या एफडीवर जास्तीत जास्त 9 टक्के एवढे व्याज देत आहे. ही बँक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे बॅंकेतून मिळणाऱ्या सोयीसुविधांचा वापर करून ज्येष्ठ नागरिक याचा फायदा घेऊ शकतात.
RBI पुन्हा व्याजदर वाढवू शकते
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत रेपो दरात वाढ केली आहे. आता रेपो दर 6.50 टक्क्यांवर आहे. ऑगस्ट 2018 नंतरचा हा रेपो दराचा उच्चांक असल्याचे बोलले जाते. आरबीआयने रेपो दर वाढविल्यानंतर आता बहुतांश बँकांनी कर्जावरील व्याज आणि एफडीवरील व्याज दर वाढवले आहेत. तर एप्रिल महिन्यात आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जाते. 'महामनी' गुंतवणुकीबाबत खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)